प्रसाद शिंदे, प्रतिनिधी:
Mumbai Goa Highway Traffic Jam: मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. विकेंड आणि पुढील आठवड्यात येणाऱ्या गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
मुंबई- गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी कोकणाकडे निघालेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे आज मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांचे निमित्त साधून मुंबई आणि उपनगरांतून मोठ्या संख्येने पर्यटक कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, माणगाव शहरात या वाहनांच्या ओघामुळे वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला असून, माणगाव शहर ते खरवली फाट्यापर्यंत तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विशेषतः मुंबईकडून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांचा भार अधिक असल्याने माणगाव बाजारपेठ आणि मुख्य चौकात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उष्णतेचा पारा वाढत असतानाच या वाहतूक कोंडीत अडकल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि अरुंद रस्त्यांचा फटकाही या निमित्ताने प्रवाशांना बसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world