CherryBlossoms Season Mumbai Viral Video: महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मुंबई शहरातील रस्त्यांवर पसरलेल्या गुलाबी बहरामुळे ही आपली राजधानी आहे की जपानमधील टोकियोमध्ये रंगणारा चेरी ब्लॉसमचा फेस्टिवल सुरु आहे, असाच प्रश्न पडत आहे. विक्रोळी हायवेलगत असलेल्या झाडांवर ही गुलाबी फुले बहरली आहेत. मुंबईकरांना या गुलाबी बहराने चांगलेच प्रेमात पाडले आहे.
गुलाबी रंगात रंगली मुंबई!
जपानमधील ‘चेरी ब्लॉसम'चा अनुभव घेण्यासाठी आता सातासमुद्रापार जाण्याची गरज उरलेली नाही. मुंबईचा पूर्व द्रुतगती महामार्ग, विशेषतः विक्रोळी ते घाटकोपर दरम्यानचा पट्टा सध्या गुलाबी रंगात न्हाऊन निघाला आहे. 'ताबेबुइया हेटेरोफिला' (Tabebuia Heterophylla) म्हणजेच ज्याला आपण 'पिंक ट्रम्पेट' म्हणून ओळखतो, त्या फुलांनी मुंबईकरांना भुरळ घातली आहे.
ट्रम्पेट वृक्षांनी वेधलं लक्ष
मुंबईचे उष्ण हवामान चेरी ब्लॉसमसाठी पोषक नसले, तरी या ट्रम्पेट वृक्षांनी शहराशी एक वेगळेच नाते जोडले आहे. या झाडांना अत्यंत कमी पाणी लागते, त्यामुळे महामार्गाच्या दुभाजकांवर त्यांची वाढ उत्तम होते. मागील काही वर्षांत गोदरेज कंपनीच्या परिसरातील हा पट्टा पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र बनला आहे. मात्र, या सौंदर्यासोबतच काही सामाजिक प्रश्नही ऐरणीवर आले आहेत. हर्षल निकाले या फोटो ग्राफरने य गुलाबी रस्त्याचा व्हिडिओ आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. सोशल मीडियावर या गुलाबी रस्त्याचे ड्रोन शॉट्स आणि रिल्स व्हायरल होत आहेत.
दुसरीकडे वाढते प्रदूषण आणि नागरिकांची बेशिस्त वर्तणूक चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक पर्यटक फोटो काढण्याच्या नादात पदपथ अडवून धरतात, तर काही पालक आपल्या मुलांसाठी झाडांच्या फांद्या ओढून फुले तोडताना दिसत आहेत. "मुंबई कधी थांबत नाही, पण या गुलाबी क्षणांसाठी ती श्वास घ्यायला शिकते," अशा भावना एका नेटिझने व्यक्त केल्या, तर स्थानिकांनी मात्र उत्साही पर्यटकांच्या 'सिव्हिक सेन्स'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world