Mumbai News: 'क्लीनअप मार्शल'ची सेवा मुंबईतून हद्दपार! BMC ने घेतला सर्वात मोठा निर्णय, कारण काय?

Clean Up Marshals' Service Mumbai: मुंबईकर नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित संस्थांना दंड आकारणीही करण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ‘स्वच्छ मुंबई अभियान'अंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ‘क्लीन अप मार्शल'च्या संस्थांचे प्रतिनिधींबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत या प्रतिनिधींची सेवा खंडीत करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यामुळे संबंधित ‘क्लीन अप मार्शल' म्हणून नेमण्यात आलेले प्रतिनिधी आणि संबंधित संस्थांची सेवा दिनांक 4 एप्रिल 2025 पासून खंडीत करण्यात येणार आहे.

नक्की वाचा - Budget Session 2025: 'महाराष्ट्रात एक नेपाळी...', अनिल परब असं काय बोलले? उद्धव ठाकरेही हसले

मुंबईकर नागरिकांनी याची नोंदी घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. दिनांक ४ एप्रिल २०२५ नंतर या ‘क्लीन अप मार्शल'कडून दंड आकारणी होत असल्यास नागरिकांनी संबंधीत प्रशासकीय विभागाशी (वॉर्ड ऑफिस) संपर्क साधावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

Advertisement

‘स्वच्छ मुंबई अभियान' अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, यासाठी महानगरपालिका विविध प्रकारे कार्यवाही तसेच जनजागृती करीत असते. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘क्लीन अप मार्शल' हा उपक्रम राबविण्यात येत होता. मुंबईतील सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये क्लीन अप मार्शल नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक प्रशासकीय विभागात विविध 12 संस्थांमार्फत प्रत्येकी 30 क्लीन अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियम व तत्वे देखील ठरवून देण्यात आले होते. 

Advertisement

नक्की वाचा - Sambhaji Bhide: 'शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, ते फक्त ...' संभाजी भिडेंचे विधान

क्लीन अप मार्शल यांनी मागील वर्षभराच्या कालावधीमध्ये 4 कोटी 93 लाख 73 हजार 712 रुपयांचा दंड वसूल केला. हा दंड वसूल करीत असतांना संबंधीत मार्शल यांनी नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, त्यांना स्वच्छतेसंबंधित नियमांचे पालन करण्यास सांगणे अपेक्षित होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त तक्रारींनुसार संबंधित मार्शल यांनी विविध नियमांचा भंग केल्याचे दिसून आले. 

Advertisement

महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांनी कळविलेल्या ठिकाणी न जाणे, करारात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कारवाई करणे अपेक्षित नसतानाही अशा ठिकाणी मार्शल प्रतिनिधींचे सातत्याने जाणे, आठवड्याचे सातही दिवस आणि 24 तास पाहणी अपेक्षित असताना मार्शल अनेकदा गैरहजर असल्याचे निदर्शनास येणे, बायोमेट्रीक हजेरीबाबत उदासीनता, नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून दंडाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम आकारणे, आपल्या कक्षेबाहेरील परिसरात जावून पाहणी करणे, हॉटेल्स, बँक्वेट हॉल तसेच होर्डिंग आणि फलक आदी बाबी करारात नसतानाही तेथून दंड आकारणे यासह करारपत्रानुसार अटी व शर्थींचे पालन न करणे आदी बाबी महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. तसेच, गत वर्षभरात क्लीन अप मार्शल यांच्या असभ्य वर्तवणुकीमुळे महानगरपालिकेच्या प्रतिमेलाही धक्का बसत होता. 

Uddhav Thackeray : "हताश, निराशावादी, सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन", उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

त्यामुळे ‘स्वच्छ मुंबई अभियान'अंतर्गत मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या क्लीन अप मार्शलच्या संस्थांचा करार दिनांक 4 एप्रिल 2025 पासून रद्द करण्यात येणार आहे. दिनांक 4 एप्रिल 2025 पासून संबंधीत संस्थांचे सर्व प्रशासकीय विभागांतील काम रद्द करण्यात येणार आहे. तसेच मुंबईकर नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत संबंधित संस्थांना दंड आकारणीही करण्यात आली आहे. 

मुंबईत स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या क्लीन अप मार्शलच्या संस्थांचे काम थांबविण्यात येत असले तरी  ‘स्वच्छ मुंबई अभियाना'ची अंमलबजावणीचे सुरू राहणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेकडून लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांनी सांगितले.