जाहिरात

Uddhav Thackeray : "हताश, निराशावादी, सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन", उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी (27 मार्च) पत्रकार परिषद घेत सरकारवर घणाघात केला.

Uddhav Thackeray : "हताश, निराशावादी, सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन", उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray PC : अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी (27 मार्च) पत्रकार परिषद घेत सरकारवर घणाघात केला. विविध मुद्द्यांवरुन त्यांनी सरकारला घेरलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाशवी बहुमत मिळालेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प होता. हताश आणि निराशावादी असा अर्थसंकल्प होता. सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. 

अपयश लपवणारं हे अधिवेशन

"ज्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी थापा रुपाने मांडल्या होत्या, त्याबद्दल अधिवेशनात कुठेही वाच्यता झाली नाही. अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. विशेषत: जेव्हा हे सरकार स्थापन झालं, त्यावेळी 100 दिवसात आम्ही काय काय करणार हा संकल्प त्यांनी मांडला होता. मात्र प्रत्यक्षात त्यातील काहीच घडलं नाही. त्यांचा संकल्प कुठेही दिसला नाही. अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. 100 दिवसातील आराखड्यापैकी एकाही गोष्टीची अर्थसंकल्पात चर्चा झाली नाही", असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Budget Session 2025: 'महाराष्ट्रात एक नेपाळी...', अनिल परब असं काय बोलले? उद्धव ठाकरेही हसले

नक्की वाचा - Budget Session 2025: 'महाराष्ट्रात एक नेपाळी...', अनिल परब असं काय बोलले? उद्धव ठाकरेही हसले

"सरकार स्थापनेपासूनच्या शंभर दिवसात काय घडलं, तर बीडच्या सरपंचांची हत्या झाली,  सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली, स्वारगेट बलात्कार प्रकरण गाजलं, रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत. सरकारने कर्जमाफीबद्दल कुठेही वाच्यत्या केली नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार होते, त्याची चर्चा झाली नाही. म्हणजे तुम्ही पैसे वाढवून देणार असल्याचं सांगत केवळ मतं घेतली.  मात्र आता बहिणींना कागदपत्रे दाखवावी लागत आहे.  दुसरीकडे प्रशांत कोरटकर सापडला पण किती दिवस आत राहिल,  त्याला काय शिक्षा होईल याबद्दल काहीच स्पष्ट नाही. दुसरीकडे राहुल सोलापूरकर अजूनही मस्तीत फिरत आहे", असा सरकारच्या घोषणा आणि अपयशाचा पाढाच उद्धव ठाकरेंनी वाचला. 

"शांत असलेल्या नागपूरमध्ये दंगल झाली. आता आम्हाला संशय येतोय की, ज्यांच्या मनात अजूनही मुख्यमंत्रिपदाचे कोंब फुटले आहेत ते अजून जात नाहीत, ते त्यांना (मुख्यमंत्र्यांना) छळत आहेत की काय? मुख्यमंत्र्यांनाही प्रश्न पडला असेल की यांना एवढ सगळं देऊनही असे का वागत आहेत?" असा टोला उद्धव ठाकरेंना नाव न घेता एकनाथ शिंदे यांना लगावला.

अधिवेशनात सत्ताधाऱ्यांचा माज दिसला

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "अधिवेशनात आणखी एक गोष्ट दिसली, ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात विरोधी पक्षाने राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी पाशवी बहुमताचा माज कसा दाखवत आहे, आम्हाला बोलू देत नाहीत, याची दाद मागितली. सभापतींवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला, असं अधिवेशन नजिकच्या काळात झालं असावं असं मला आठवत नाही." 

Sambhaji Bhide: 'शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, ते फक्त ...' संभाजी भिडेंचे विधान

नक्की वाचा - Sambhaji Bhide: 'शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, ते फक्त ...' संभाजी भिडेंचे विधान

"खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी या सरकारची गत झाली आहे. वारेमाप घोषणा केल्या गेल्या. मात्र पूर्तता काही नाही. काहीही थापा मारा, जनतेला फसवा. जनता आपल्याला मत देईल, आपल्याला सत्ता देईल. सत्तेत आल्यावर दडपशाही करायची, वेगवेगळे कायदे आणायचे. सरकारबद्दल काही बोललं की चिरडून टाकायचं. जी दडपशाही ब्रिटीशांना देखील जमली नाही, ती यांना काय जमणार. यांना जमूच शकत नाही", असं म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून घडणाऱ्या घटनांविषयी उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला.