मुंबई: एन.एम.एम.टी.ची महिला विशेष "तेजस्विनी" बस सेवेच्या मार्गात वाढ करण्यात आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या "तेजस्विनी" बस सेवा शहरातील तीन मार्गांवर चालू असल्याची माहिती एन.एम.एम.टी. चे व्यवस्थापक योगेश कडूस्कर यांनी दिली. राज्य शासनाने महिलांच्या सन्मानार्थ परिवहन विभागाच्या अंतर्गत "तेजस्विनी बस" उपक्रम राज्यभरात राबवला.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सन 2019 मध्ये 10 तेजस्विनी महिला बस परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या. नवी मुंबई शहरातील महिलांच्या दैनंदिन प्रवासाच्या सुरक्षिततेच्या व सुलभतेच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाच्या सहकार्याने या बस उपलब्ध झाल्या आहेत. गर्दीच्या वेळी महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी परिवहन उपक्रमाकडून या बस चालवल्या जात आहेत.
प्रारंभी एक वर्ष ही बस सेवा सुरळीत चालू होती. त्यानंतर कोरोनामुळे अनेक महिने या बस प्रवाशांच्या सेवेत नव्हत्या. कोरोनानंतर या बस मार्गावर काढल्यावर काही बस मध्ये मेजर तांत्रिक बिघाड निदर्शनास आले. त्यानंतर अंशतः ही बस सेवा सुरू होती. यातील काही बस प्रशासनाने टाटा मोटर्स कंपनीकडे पाठपुरावा करून दुरुस्तीसाठी पाठवल्या होत्या. त्यामुळे एखादा दुसरा मार्ग "महिला विशेष" म्हणून चालवला जात होता.
विशेष म्हणजे या दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाने एक रुपयाही खर्च न करता टाटा मोटर्स कंपनीलाच हा खर्च करायला भाग पाडले आहे. त्यामुळे उपक्रमाची आर्थिक बचतही झाली आहे. २०२४ पासून दुरुस्तीनंतर टप्प्याटप्प्याने या सर्व बस उपक्रमात दाखल होऊ लागल्या आहेत. सध्या यातील ७ बस उपक्रमात ३ मार्गांवर सेवा देत आहेत. यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत त्यानंतर सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत "फक्त महिलासाठी" ही बस "महिला विशेष म्हणून सुरु आहे. इतर वेळेत पुरुष आणि मुले यांनाही या बस मधून प्रवास करता येत आहे.
बस ९ क्रमांक घणसोली ते वाशी रेल्वे स्थानक
बस ५० - घणसोली ते पनवेल रेल्वे स्थानक
बस २३- आर्टिस्ट व्हिलेज ते खारकोपर रेल्वे स्थानक