Mumbai News : १६ जून रोजी महाराष्ट्र सरकारने १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले होते. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचंही नाव होतं. यामध्ये IAS अधिकारी अश्विनी जोशी यांना MMRDA च्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते.
आदेश निघाल्याच्या २४ तासांच्या आतच अश्विनी जोशींच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. १६ जूनच्या आदेशातील १२ IAS अधिकाऱ्यांपैकी केवळ अश्विनी जोशी यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारने अचानक घेतलेल्या यूटर्नमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
डॉ. अश्विनी जोशी कोण आहेत?
डॉ. अश्विनी जोशी या महाराष्ट्र केडरच्या २००६ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीसाठी त्यांची ओळख आहे. त्यांनी मुंबईतून दंतचिकित्सेची पदवी घेतली आहे. डॉ. अश्विनी जोशी यांनी राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. त्या नियंत्रक, रेशनिंग विभाग, नागरी पुरवठा (मुंबई), ठाण्याच्या जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर चांगली कामगिरी बजावली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकारी असताना त्यांनी भू-माफिया आणि बेकायदेशीर वाळू उपशांविरोधात कडक मोहीम राबवली होती. रेशनिंग व्यवस्थेत असतानाही त्यांनी अनेक गैरव्यवहारांना आळा घातला.