IAS Officer Tukaram Mundhe Transfer : जबरदस्त काम आणि वारंवार होत असणाऱ्या बदलींमुळे चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मार्च महिन्यातच त्यांची २४ वी बदली झाली होती. आता मे महिन्यात त्यांना २५ व्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारे त्यांच्या बदलीची जणू Silver Jubilee झाल्याचं दिसून येत आहे.
IAS तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी
वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदी करण्यात आली आहे. मार्च २०२६ मध्ये त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात त्यांची बदली अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २१ वर्षात ही २५ वी बदली आहे. तुकाराम मुंढे त्यांच्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. त्यांच्या कामाबरोबरच वारंवार होणाऱ्या बदलीमुळेंही ते चर्चेत असतात.
तुकाराम मुंढेंव्यतिरिक्त आणखी तीन बदल्या...
सनदी अधिकारी कान्हुराज बगाटे हे एमडी महाडिस्कॉम, कल्याण येथून महामुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या एमडीपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय श्रीधर डुबे अन्न आणि औषधी प्रशासनपदावर आयुक्त होते, आता त्यांची झोपडपट्टी पुनर्वसन, ठाण्याच्या सीईओपदी बदली करण्यात आली आहे. बाबासाहेब बेलदार यांची महात्मा फुले महामंडळाच्या एमडी पदावरुन जिल्हा परिषद धुळे येथील सीईओपदी बदली करण्यात आली आहे.
२१ वर्षात तुकाराम मुंढे यांची २५ वेळा बदली...
ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै 2009 - सीईओ, वाशिम.
जून 2010 - सीईओ, कल्याण.
जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.
मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.
डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग
जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
जून 2024 - असंघटित कामगार विभाग
ऑगस्ट 2025 - दिव्यांग कल्याण विभाग
मार्च 2026 - आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभाग
मे 2026 - अन्न आणि औषध प्रशासन, आयुक्तपदी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world