कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची फटकेबाजी सुरू आहे. सातारा, बारामती, पुणे आणि कोकणातील अनेक भागात पाऊस बरसत आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येत आहे.
रात्रीपासून मुंबई सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 27 आणि 28 मेला रायगडात ऑरेंज अलर्ट, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांना 27 मेला रेड अलर्ट देण्यात आला आहे.