सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात तर पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. परिणामी मुंबईतही पाणी टंचाईची झळ पोहोचली जाण्याची शक्यता असताना पालिकेकडून मुंबईकरांना दिलासा देण्यात आला आहे.
वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या'तून (Contingency Reserve) पाणी उपलब्ध करून दिले आहे, असं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (५ मे २०२५ ) उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा - Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा, जलसाठ्यांनी तळ गाठला, किती पाणीसाठी शिल्लक?
सद्यस्थितीचा विचार करता मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाही. दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारितीने नियोजन केले आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे,हवामान खात्याशी समन्वय साधून पावसासंबंधी अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
सद्यपरिस्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण २२.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र शासनानेदेखील बृहन्मुंबई महानगरपालिकेस भातसा धरण आणि अप्पर वैतरणा धरणातून निभावणी साठ्यातून (Contingency Reserve) अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाणीकपातीची कोणतीही आवश्यकता नाही. असे असले तरीही मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.