रेवती हिंगवे, पुणे: पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा गजा मारणे टोळीने धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. शिवजयंतीदिवशी गाडीवरुन जाताना कट मारल्याच्या रागातून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या देवेंद्र जोग याला तिघांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता याच प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करत पुणे पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
"दोन दिवसापूर्वी कोथरूडमध्ये हा मारहाणीचा प्रकार घडला. देवेंद्र जोग माझ्या ऑफिसला कामाला नाही,पण तो भाजपमध्ये काम करतो. कोथरूडमध्ये जायला जागा नव्हती म्हणून त्याला मारहाण केली.देवेंद्र असेल किंवा अजून कोणीही असो माझ्या शहरात अस झालं नाही पाहिजे. यावर कारवाई झाली पाहिजे," असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
"पुण्यातील कुठल्याही भागात अस होत असेल तर ते चुकीचं आहे. यांना कोणी वाचवायला येत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. सोशल मीडियावर जे सुरू आहे त्याबाबत पुणे पोलीस डोळे झाकून बंद का आहेत? जर पुण्यात पोलिसाला मारहाण होत असेल तर आम्ही पुणे पोलीस आयुक्तांना सांगतो अस चालू देणार नाही.." असा इशाराही मुरलीधर मोहोळ यांनी दिला.
(नक्की वाचा- आमदार निवासातील घरांवरुन आमदारांमध्ये जुंपली; अनेक मंत्र्यांकडून सत्तेचा गैरवापर)
दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनीही देवेंद्र जोग या मारहाण झालेल्या कार्यकर्त्याची घरी जाऊन भेट घेतली तसेच तब्येतीची चौकशी केली. देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही. आज देवेंद्रच्या बाबतीत असा प्रकार घडला उद्या कोणत्याही तरुणाच्या बाबतीत होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती पावले उचलण्याबाबतही पोलीस आयुक्तांना सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.