संजय तिवारी, प्रतिनिधी
नागपूरजवळ तीन दिवसांपासून सौम्य तीव्रतेचे धक्के बसल्याची नोंद होते आहे. हे भूकंपाचे झटके आहेत यात तज्ज्ञांना संशय नाही. पण यामुळे जिओलोजिस्टस आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, मध्य भारतात विदर्भ आणि नागपूर हे 'नो सेईस्मिक ॲक्टिव्हिटी झोन' मध्ये येतं. नागपूरखाली भूगर्भात कोणतीही फॉल्ट लाईन नाही. त्यामुळे सतत तीन दिवस दुपारी सौम्य तीव्रतेचे धक्के अपेक्षित नाहीत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात काही भूगर्भ शास्त्रज्ञांशी 'NDTV मराठी' नं चर्चा केली. त्यावेळी त्यांनी दोन शक्यता व्यक्त केल्या. अर्थक्वेक जिओलॉजी डिविजन (EGD) चे सेवानिवृत्त संचालक डॉ. अंजान चटर्जी यांनीभूगर्भात खोलवर कुठे तरी नव्याने कोणती तरी अज्ञात फॉल्ट लाईन पुन्हा सक्रिय (activate) झाल्याची शक्यता व्यक्त केली. मात्र त्याबाबत सखोल अध्ययन केल्यानंतरच निष्कर्ष काढला जाऊ शकतो. हे शक्यता खरी असेल तर ती गंभीर बाब असू शकते. मात्र असे कुठलेही निष्कर्ष काढण्यासाठी शास्त्रीय अध्ययन करावे लागेल, या गोष्टीकडं त्यांनी वारंवार लक्ष वेधलं.
( नक्की वाचा : छत्रपती संभाजीनगरात सुरू होतं विहिरीचं खोदकाम, महसूल विभागाने का थांबवलं? चर्चेला उधाण )
दुसरी शक्यता म्हणजे, 'सध्या तीव्र उन्हाळा आणि अवकाळी पावसामुळे तापमानात वेगानं चढउतार होत आहे. त्याचा भूगर्भातील घडामोडींवर परिणाम होऊ शकता. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर भूगर्भातील पाण्याच्या साठ्यांवर वेगात घडणाऱ्या तापमान बदलाचा परिणाम होऊन सौम्य झटके शक्य आहेत. ही तितकी चिंताजनक बाब नाही.
विदर्भ हे खनिजांच्या बाबतीत समृद्ध असून इथे मोठ्या प्रमाणात कोळसा, मँगॅनीज आदी खनिजांचे खनन केले जाते. जे सौम्य तीव्रतेचे धक्के नोंदविण्यात आले आहे ते कोळसा किंवा अन्य खाणींच्या पट्ट्यात घडले असल्याचे एक महत्त्वाचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून अंतिम निष्कर्ष काढण्यात यावा, आणि त्याआधी कुठलीही अफवा पसरू नये याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे, असे या विषयातील जाणकारांनी सांगितलं आहे.