जाहिरात
This Article is From Apr 16, 2024

नागपुरची चितार ओळी अन् विविध छटांनी साकारलेलं रामाचं ते प्रसन्न करणारं रूप

मोठ्या शोभा यात्रेत यावर्षी चाळीस मोठे देखावे चित्ररथ सहभागी होणार आहेत. त्यामुळे चितार ओळीत मूर्तीवरून शेवटचा हात फिरवणं किंवा मूर्ती स्प्रे पेंट करणं अशा कामात कलाकार मंडळी व्यस्त आहेत.

नागपुरची चितार ओळी अन् विविध छटांनी साकारलेलं रामाचं ते प्रसन्न करणारं रूप
नागपूर:

संजय तिवारी

चितार ओळी... मध्य भारतातील सगळ्यात मोठी मूर्तीकारांची बाजारपेठ. नागपुरात राहणाऱ्या व्यक्तीला या बाजारापेठेविषयी विशेष सौख्य. चितार ओळीत प्रवेश केला की डाव्या हाताला वामन दुरगकरांचं एक दुकान लागतं. दुकानावरील पाटीवर मूर्तिकार वामन देवराव दुरगकर असं लिहिलंय. 77 वर्षीय वामनराव श्रीरामाच्या मूर्तीचे डोळे अगदी मन लावून रंगवतात. इतकं की, आजूबाजूला लोक थबकली, तिथंच उभी राहून पाहू लागली तरी त्यांना काही भान राहत नाही. श्रीरामाच्या मूर्तीचे डोळे निळ्या रंगाच्या विविध छटा वापरून साकारण्यात ते अत्यंत मग्न झालेत. यावर काही विचारलं तर ते म्हणतात, 'श्रीरामाला राजीव लोचन सुद्धा म्हटलंय. राजीव म्हणजे कमळ आणि लोचन म्हणजे नयन किंवा डोळे. त्यामुळे खास लक्ष द्यावं लागतंय.'  दुरगकरांची पाचवी पिढीसुद्धा याच क्षेत्रात आहे. इथल्या गणेश मूर्ती दरवर्षी परदेशात पाठवल्या जातात असं इथल्या प्रत्येक कलाकाराचं आवर्जून सांगणं असतं.

श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने नागपूर शहरात निघणाऱ्या दोन मुख्य शोभायात्रांपैकी मोठी शोभायात्रा ही पोध्दारेश्वर राम मंदिरातूनच निघते आणि दुसरी राम नगर मंदिरातून. मोठ्या शोभा यात्रेत यावर्षी चाळीस मोठे देखावे चित्ररथ सहभागी होणार आहेत. त्यामुळे चितार ओळीत मूर्तीवरून शेवटचा हात फिरवणं किंवा मूर्ती स्प्रे पेंट करणं अशा कामात कलाकार मंडळी व्यस्त आहेत. मातीच्या मूर्तींसाठी विख्यात असलेल्या चितार ओळीत हल्ली फायबरच्या मूर्ती सुद्धा तयार केल्या जात असून त्यांचे चलन हळूहळू वाढत आहे.

यावर्षी सुद्धा प्रशांत माहुरकर यांच्याकडे फायबरच्या श्रीराम, जानकी, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मूर्ती उपलब्ध आहेत. माहुरकर घराणे मातीच्या मुर्तींकरिता सुप्रसिद्ध आहेत. पण आता बदलत्या चलनानुसार फायबरच्या मूर्ती सुद्धा करणे भाग असल्याचं ते सांगतात. मातीची मूर्ती पंचवीस हजारापर्यंत मिळते, तर फायबरच्या तशाच मूर्तीसाठी साधारण पन्नास हजार इतका खर्च येतो. फायबर मूर्ती अनेक वर्षे टिकते आणि पुन्हा पुन्हा वापरता येते. शिवाय चांगली मूर्ती घडवायला चांगली माती सुद्धा मिळणं दुरापास्त झालं आहे आणि मिळाली तर परवडत नाही. त्यामुळे आता किमान दहा टक्के फायबर मूर्ती दिसतील आणि पुढे हे प्रमाण वाढेल, असं त्यांचं म्हणणं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

साडे तीनशे वर्षांचा इतिहास
मध्य नागपूरची चितार ओळ बाजारपेठ तब्बल साडे तीनशे वर्षे जुनी आहे. राजे रघुजी राजे भोसले यांनी मातीच्या मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांना मध्य भारतातील विविध ठिकाणांहून बोलावून मुद्दाम इथे वसवण्यात आले होते आणि तेव्हापासून इथे पिढ्या न पिढ्या मातीच्या रेखीव, सुबक मूर्ती घडविल्या जातात; असं प्रशांत माहूरकर सांगतात. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com