Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी, लग्नाआधीच घडलं असं काही.. तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त

प्रदीर्घ काळापासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या मुख्य आरोपी  महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Nagpur Marriage Fraud News:  नागपुरात आणखी एक लुटेरी दुल्हनचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नासाठी मुलगी शोधायला नागपुरात आलेल्या एका गुजरातच्या 35 वर्षीय व्यक्तीची नागपुरात फसवणूक झाल्याचा प्रकार याच वर्षी मार्च महिन्यात घडला होता. त्याला दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाखांवर रुपयांचा फटका बसला होता.

दागिने गेले, रक्कम गेली, नियोजित वधू सुद्धा विवाहित निघाली आणि ती देखील गेली असा प्रकार यावेळी घडला. आता याच प्रकरणात प्रदीर्घ काळापासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या मुख्य आरोपी  महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यापूर्वी देखील, नागपुरात असे प्रकार उघडकीस आले आहेत. 

Advertisement

नागपुरात लुटेरी दुल्हन.. लग्न न करताच नम्रता पसार! 

गुजरातच्या भावनगर येथील 35 वर्षीय कुरिअर व्यावसायिक आकाश पारेख यांना लग्न करायची इच्छा होती. नागपूरमध्ये एक मुलगी आहे, असे एका व्यक्तीने सांगितले म्हणून ते एका परिचितासह या वर्षी मार्च महिन्यात नागपूरला आले होते. तेव्हा घडलेला हा प्रकार आहे. मुख्य आरोपी राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे हिने त्यांना 21 वर्षीय नम्रता धकाते हिला संभाव्य वधू म्हणून दाखवले. मात्र, फिर्यादीने मुलीचे घर पहायची आणि तिच्या आईवडिलांशी भेटण्याची इच्छा दाखवली. मग, कोराडी येथे एका व्यक्तीच्या घरी या मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम झाला.

लगोलग त्याच दिवशी लग्न करायची तयारी सुद्धा दर्शविण्यात आली होती. मात्र काही खर्च करावा लागेल आणि दागिने विकत घ्यावे लागतील अशी अट टाकण्यात आली. सदर फिर्यादीला ए टी एम मधून 70 हजार रुपये रोख काढायला लावण्यात आले. तसेच फिर्यादी कडे असलेले दीड लाख रुपयांचे दागिने सुद्धा वधू साठी घेण्यात आले होते. यात सोन्याचे मंगळसूत्र, कानाचे दागिने आणि चांदीच्या पैजणीचा समावेश आहे. मात्र, त्यानंतर कोराडी येथे लग्न लावण्याऐवजी सीताबर्डी भागात एका मंदिरात लग्न लावुया, तिथे लग्नाचे सर्टिफिकेट मिळेल, असे सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशी त्या तरुणासह सारे सीताबर्डी येथे मंदिरात पोहोचले. मात्र, अशातच तिथे एक तरुण आला आणि ही तर माझी पत्नी आहे असे सांगून फिर्यादीसोबत वादावादी करायला लागला. तुम्ही हिच्याशी लग्न कसे करू शकतात, हे बेकायदेशीर आहे वगैरे बोलून त्या तरुणाने फिर्यादीसोबत भांडण केले. त्याचे काही साथीदार यात सहभागी झाले. लग्नास इच्छुक असलेल्या फिर्यादीला मारहाण करून महिलांसह सारे आरोपी तिथून पळून गेले होते. नियोजित वधू देखील तिच्या असली पतीसोबत मोटारसायकलने पळून गेली.

Rain News: राज्यात पावसाचे थैमान सुरुच! आज 'या' जिल्ह्यांना झोडपणार; कुठे-कुठे शाळांना सुट्टी? वाचा डिटेल्स

मुख्य आरोपी महिला अटकेत! 

मया बाबतीत तहसील पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली असता तथाकथित नियोजित वधू नम्रता हिला अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी कोमल जितेंद्र पांडे ही बेपत्ता होती आणि काही केल्या तिची माहिती मिळत नव्हती. मात्र, गुरुवार 30 जुलै रोजी ती नागपूरच्या पाचपावली परिसरात आपल्या राहत्या घरी आल्याची माहिती गुप्त सूत्रांकडून पोलिसाना मिळताच पोलिसांनी तयारीनिशी तिथे जाऊन तिला अटक केली. शुक्रवार 31 जुलै रोजी न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

Advertisement

या टोळीत आणखी लोक गुंतलेले असल्याचा पोलिसांना संशय असून कोराडी येथे ज्यांच्या घरी तथाकथित दुल्हन ला दाखवण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता त्यांची या प्रकरणात काय भूमिका आहे, याचा सुद्धा तपास शिल्लक आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास अजून सुरू असून फिर्यादीकडून फसवून घेण्यात आलेले पैसे आणि दागिने अद्याप परत मिळायचे आहेत. या टोळीने अन्य लोकांना सुद्धा अशाच फसवले असावे, असा नागपूरच्या तहसील पोलिसांना संशय असून त्यांनी या टोळीकडून कुणी फसवले गेले असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Nashik News: नाशिक जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट, 8 तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


Topics mentioned in this article