Nagpur News : धीरेंद्र शास्त्री विरुद्ध श्याम मानव; 80 लाखांचं बक्षीस; आव्हान स्वीकारलं आता कोण मारणार बाजी?

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Nagpur News : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या रामकथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांचे आव्हान स्वीकारत असल्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. कुणाला काही म्हणायचं असेल तर त्यांनी समोर यावं, अशा शब्दांत धीरेंद्र शास्त्री यांनी मानव यांना प्रत्युत्तर दिलं असून याचा व्हिडिओही त्यांनी जाहीर केला आहे.

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा रविवारपासून नागपुरात रामकथेचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात बाबा ‘दिव्य दरबार' भरवत असतात. या दरबारात बाबा चमत्कार करून अनेकांच्या असाध्य रोगांवर उपचार करत असल्याचा दावा करतात. चिठ्ठीमध्ये आलेल्या भक्तांची सर्व माहिती, अगदी मोबाईल नंबरसह, ते अचूक सांगतात असा दावा केला जातो.

Advertisement

नक्की वाचा - Nagpur News : 9 तास गर्भकळा, मावशी महिलेच्या छातीवर बसली अन्...; नागपुरात पीडितेच्या पतीचा धक्कादायक आरोप

काय असतो बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा दिव्य दरबार

* रामकथेच्या कार्यक्रमात ‘दिव्य दरबार' म्हणजे हनुमानजींच्या आशीर्वादाने सर्व कामे होतात, असा बाबांचा दावा.

* या दिव्य दरबारात देशभरातून लोक येतात.

* नागपूरच्या रेशीमबाग येथील कार्यक्रमाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातून हजारो लोक दाखल झाले आहेत.

* अनेक असाध्य रोगांवर चमत्काराने उपचार केल्याचा दावा केला जातो.

* काही लोक पुढे येऊन बाबांमुळेच आपले रोग बरे झाल्याचा दावा करतात.

बागेश्वर बाबा विरुद्ध श्याम मानव...

अनोळखी व्यक्तींचे मोबाइल नंबर किंवा वैयक्तिक माहिती आधीच मिळवून ठेवली जाते आणि नंतर ती स्टेजवरून सांगितली जाते, असा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप आहे. शिवाय, लोक डॉक्टरांकडून बरे होतात आणि त्याचे श्रेय बाबांना देतात, असेही अंनिसचे म्हणणे आहे. मात्र, “मी कोणताही चमत्कार करत नाही, हे सर्व हनुमानजींचे कार्य आहे,” असे बाबा बागेश्वर सांगतात. “माझ्याकडे जी विद्या आणि शक्ती आहे, तिचेच मी प्रदर्शन करतो. मी काही जादूगार नाही. ईश्वर प्रेरणा देतात आणि त्यानुसार मी लोकांना मार्गदर्शन करतो,” असा त्यांचा दावा बाबा बागेश्वर यांचा आहे. दरम्यान, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी श्याम मानव यांना आव्हान दिलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

* “मी पाच दिवस इथे आहे, मध्य प्रदेशात नाही. रामकथा सुरू आहे. प्रदेश त्यांचा, मंचही त्यांचाच.”

* “कुणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी समोर यावे. दोन दिवस दरबार लागणार आहे.”

* “३० तारखेला मी निघून जाणार, मग म्हणू नका की बाबा पळून गेला.”

* “त्यांचा आणि आमचाही त्रास संपेल.”, असं बाबा म्हणाले.

चमत्कार करा अन् ८० लाख जिंका...

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना नागपुरात त्यांचे चमत्कार सिद्ध करून दाखवण्याचं खुलं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली होती. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री नागपूर सोडून जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी रामकथेच्या मंचावरून हे आव्हान स्वीकारत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, हे आव्हान तटस्थ ठिकाणी, म्हणजे पत्रकारांसमोर करावे, अशी श्याम मानव यांची मागणी आहे. कारण दिव्य दरबारात हजारो लोक आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित असतात, त्यामुळे तेथे वाद होऊ शकतो, असे अंनिसचे म्हणणे आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावेत आणि ८० लाख रुपयांचे बक्षीस जिंकावे, असे आम्ही आव्हान दिले आहे. आधी हे बक्षीस ३० लाख रुपये होते, ते आता ८० लाख रुपये केले आहे.

नाव, मोबाईल नंबर आणि एखाद्या भक्ताच्या घरातील वस्तूंची अचूक माहिती सांगण्याचा दावा केला जातो. पण पत्रकारांसमोर दहा लोकांची माहिती किंवा जवळच्या खोलीतील वस्तू ओळखण्याचे आव्हान अंनिसने दिले आहे. बाबांकडे कोणतीही दिव्य शक्ती नसून ते लोकांची फसवणूक करतात, असा आरोप केला जात आहे. जर ९० टक्के माहिती अचूक सांगितली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती बंद करून आम्ही त्यांचे भक्त होऊ, असेही आव्हान अंनिसकडून करण्यात आलं आहे.