नागपुरात (Nagpur News) कामठी शहरात यादव नगर गवळीपुरा भागात एका उड्डाणपुलाचं उद्घाटन होण्यापूर्वीच रस्त्यावर भलेमोठे खड्डे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी काटई नाक्याजवळील पलाव्हा मॉलवरील उड्डाणपुलाची लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी दुर्दशा झाल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर शासनावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील नागपुरात असाच एक प्रकार समोर आला आहे.
नागपूर जिल्ह्यात 9 जुलै रोजी झालेल्या पावसाने एका उड्डाण पुलावर मोठे खड्डे (Potholes on road before inauguration) झाल्याचं धक्कादायक वृत्त आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात यादवनगर गवळीपुरा भागातील या उड्डाणपुलाचे अद्याप उद्घाटन होणे शिल्लक आहे. या पुलाचे काम गेली पाच-सहा वर्षे सुरूच होते. मात्र, उद्घाटनापूर्वीच्या पहिल्याच पावसात कंत्राटदाराच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामाच्या गुणवत्तेचे धिंडवडे निघाले आहेत. सोशल मीडियावरही या खड्ड्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम खाते यापूर्वीही वादग्रस्त राहिले आहेत. बेरोजगार अभियंत्यांना काम वाटपात अनियमिततेचे आरोप संघटनेतर्फे याआधीच NDTV मराठी जवळ करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी नागपूर बांधकाम विभागातील लाच प्रकार उघडकीस आलं होतं. कार्यालयातील क्लार्ककडून अभियंता कंत्राटदाराकडे लाचेची मागणी, त्यावर वाटाघाटी, रोख रकमेची मोजणी आदी गैरप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
नक्की वाचा - Samruddhi Highway : नागपूर ते मुंबई आता Non Stop, अवघ्या 8 तासात गाठा मुंबई!
त्यावर चौकशी झाली काय, कुठवर झाली, त्याचा निष्कर्ष काय निघाला ते अद्याप गुलदस्त्यात आहे. मुख्य अभियंत्यांकडून फक्त संबंधित क्लार्कला निलंबित करण्यात आले. मात्र या प्रकरणाचा तपास त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे दिला का किंवा सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज ताब्यात घेतलं काय यासारखे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. अशा वादग्रस्त विभागातील कामाच्या दर्जाची हे नवे प्रकरण व्यथित करणारे असून राज्य सरकार आणि विशेषतः सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणे आवश्यक दिसते.