नागपूर: घरात तब्बल 15 वर्षांनी पाळणा हलल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. मात्र बाळाच्या जन्मानंतर दोन दिवसातच त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या बाबुळखेडा परिसरात राहणाऱ्या नंदा बोरकर यांच्या दोन दिवसांच्या बाळाचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप बाळाचे वडील चेतन बोरकर यांनी केला आहे.
Navi Mumbai Crime : 'साठा जुना दर मात्र नवे', नवी मुंबईत बार मालकांकडून ग्राहकांची लूट
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूरच्या बाबुळखेडा परिसरात राहणाऱ्या बोरकर दांपत्याला तब्बल 15 वर्षांनंतर अपत्यप्राप्ती झाली होती. 15 वर्षांनी घरी पाळणा हलल्याने घरात सर्वांनाच आनंद झाला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळचं होते. जन्मानंतर बाळाचा दोन दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
बाळ जन्मल्यावर त्याचे वजन केवळ दीड किलो होते, त्यामुळे त्याला मेडिकल हाॅस्पिटलमध्येच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. 18 जुलै रोजी साडेबाराच्या सुमारास एका नर्सने बाळाला लस दिली. त्यानंतर लगेचच बाळाला उचक्या लागायला लागल्या. नर्सने "बाळाला झोपू द्या, दीड तासाने दूध पाजा" असे सांगून तिथून निघून गेली. दीड तासानंतर बाळाला उठवण्याचा प्रयत्न केला असता, तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. बाळाच्या फुफ्फुसात दूध गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती चेतन बोरकर यांनी दिली.
( नक्की वाचा:कारचा पाठलाग, अश्लील मेसेज, वकिलाकडून महिला अधिकाऱ्याचा विनयभंग )
त्यावेळी उपचारासाठी प्रशिक्षित डॉक्टर उपस्थित नव्हते, केवळ एक पुरुष परिचारक तिथे होता असा आरोपही चेतन बोरकर यांनी केला आहे. "जर त्या वेळी तज्ञ डॉक्टर उपस्थित असते, तर बाळाचे प्राण वाचले असते," असेही बोरकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे