Nagpur Crime: गणिताचे उत्तर चुकले म्हणून विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात देवळी कला येथे ही घटना घडलीय या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चाईल्ड हेल्पलाइनच्या हस्तक्षेपानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकाची विद्यार्थिनीला मारहाण
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवळी कला येथे गणिताचे उत्तर चुकले म्हणून पाचवीतील एका विद्यार्थिनीला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
१० मार्च २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गणिताचा तास सुरू होता. एका गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून संबंधित शिक्षकाचा संयम सुटला आणि त्यांनी या चिमुरडीला बेदम चोप दिला. संतापजनक बाब म्हणजे, मारहाण केल्यानंतर या शिक्षकाने मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून धमकीही दिली. "ही घटना कोणाला सांगितल्यास मुलीला शाळेतून काढून टाकू," असा पवित्रा शिक्षकाने घेतल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
मात्र, या घटनेची माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळताच त्यांनी तत्परता दाखवली. हेल्पलाईनच्या चमूने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित नराधम शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
VIDEO: कुत्र्यासारखा भुंकतोय, चालतोय... तरुणाची झालीय 'अशी' भयावह अवस्था; व्हिडिओ पाहून हादरुन जाल