देवेंद्र फडणवीसांना आव्हान देण्यासाठी काँग्रेससह राशपचा बडा नेताही इच्छुक, नागपूर दक्षिण-पश्चिमसाठी दिग्गजांमध्ये धुमश्चक्री होणार?

महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागा वाटप अद्याप बाकी असून उमेदवारांची घोषणाही अद्याप होणे बाकी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात लक्षवेधी मतदारसंघांपैकी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ मानला जातो.

Advertisement
Read Time: 4 mins
नागपूर:

संजय तिवारी

महाराष्ट्राची विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024)  निवडणूक जवळ आली असून सगळे राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागा वाटप अद्याप बाकी असून उमेदवारांची घोषणाही अद्याप होणे बाकी आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात लक्षवेधी मतदारसंघांपैकी नागपूर दक्षिण पश्चिम (Nagpur South West Constituency) मतदारसंघ मानला जातो. इथून भाजपचे देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत. फडणवीस हे सलग 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.   2024 च्या निवडणुकीतही या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विकास ठाकरे आणि फडणवीसांमध्ये लढत झाली होती. ही निवडणूक फडणवीसांनी जवळपास 27 हजारांच्या फरकाने जिंकली होती. 2014 साली त्यांच्यासमोर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुढधेंचे आव्हान होते. यावेळी फडणवीसांनी गु़डधेंना जवळपास 58 हजारांच्या फरकाने पराभूत केलं होतं. 2019 साली फडणवीसांसमोर काँग्रेसच्या आशिष देशमुखांचे आव्हान होते. फडणवीसांनी देशमुखांना जवळपास 49 हजार मतांनी पराभूत केलं होतं. यावेळी फडणवीसांना आव्हान कोण देणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला असून काँग्रेससह राशपही इथून फडणवीसांना आव्हान देण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.

Advertisement

नागपुरात आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये लढत होणार ?

फडणवीसांनी 2019 साली ज्या आशिष देशमुखांना पराभूत केलं होतं ते आता भाजपमध्ये आलेले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांचे काका लागतात.  अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपल्यामार्फत पैसे घ्यायचे असा आरोप सध्या अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केला होता. वाझेंनी हा आरोप करण्यापूर्वी देशमुख यांनी आरोप केला होता की, 'उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करुन द्यावं यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. ' असे न केल्यास अटक होईल असे सांगण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. वाझेंनी केलेले आरोप ही फडणवीसांची चाल असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या सगळ्या वादात देशमुखांचे पुतणे आशिष देशमुख यांनीही उडी मारली होती. त्यांनी आरोप केला होता की अनिल देशमुखांचा पारंपरीक मतदारसंघ असलेल्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर देशमुखांचा मुलगा सलील याने दावा केला आहे. सलील यांनी यासाठी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या भेटीही घेतल्या असून यामुळे अनिल देशमुखांना आता दुसरा मतदारसंघ शोधावा लागत आहे. देशमुख यांनी आपली नजर नागपूर दक्षिण पश्चिमवर खिळवली असून यासाठीच ते फडणवीसांवर आरोप करत असल्याचे आशिष देशमुखांनी म्हटले होते

Advertisement

गुडधेंची तयारी, केदारांची साथ

या मतदारसंघातून फडणवीसांसमोर पूर्वी पराभूत झालेले प्रफुल्ल गुडधे हे पुन्हा तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मतदारसंघ आतापर्यंत काँग्रेसच्या वाट्याला येत होता. मात्र गेल्या 4 निवडणुकांत काँग्रेसच्या उमेदवाराचा सलग पराभव झाला आहे. त्यामुळे ही जागा आपल्याकडे खेचण्याचे राशपचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र याकडे लक्ष न देता गुडधे यांनी आपली तयारी सुरू ठेवली आहे. मागील 2-3 वर्षांपासून ते या मतदारसंघात खूप सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार हे त्यांना मदत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणात अटक झाली होती, त्यामुळे त्यांची आमदारकी गेली आहे. सध्या केदार जामिनावर आहेत.

Advertisement

पुन्हा देशमुख विरूद्ध फडणवीस?

जर ही जागा अनिल देशमुखांना आपल्याकडे खेचण्यात यश आले आणि या मतदारसंघातून फडणवीसांना पुन्हा उमेदवारी मिळाली तर देशमुख कुटुंबातील फडणवीसांविरोधात निवडणूक लढवणारी ते तिसरी व्यक्ती ठरतील.  2004 मध्ये अनिल देशमुख यांचे भाऊ रणजित देशमुख यांनी फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवली होती, परंतु ते पराभूत झाले. 2019 साली  रणजित देशमुख यांचा मुलगा आशिष देशमुख यांना फडणवीसांना पराभूत केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे नागपूर शहरातील सहा पैकी पूर्व नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघ मागण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, यावेळी दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघ अनिल देशमुख यांच्यासाठी किंवा अन्य कुणासाठीही सोडण्याच्या मनस्थितीत काँग्रेस दिसत नाही.  शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहरातील सर्व सहाही विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच लढेल असे स्पष्ट केले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उध्दव ठाकरे या आघाडीतील अन्य पक्षांनी नागपुरातील कोणत्याही विधानसभा मतदार संघात आजवर यश प्राप्त केलेले नाही, त्यामुळे त्यांना जागा सोडण्याचा प्रश्न नाही, अशी भूमिका नागपूर काँग्रेसने घेतली आहे.

तिकडे, 1995 पासून अनिल देशमुख सातत्याने काटोल येथून विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवित असून 2014 चा अपवाद वगळता ते सातत्याने येथून जिंकत आले आहेत. मात्र, या वेळी त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी काटोल येथून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. काटोल तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य असलेले सलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून काटोल येथून तिकीट मागितले आहे.  वडिलांसाठी मतदारसंघाचे काम सांभाळताना किंवा त्यानंतर अनिल देशमुख सीबीआयच्या अटकेत असताना सलील देशमुख यांनी मतदारसंघाची जबाबदारी सांभाळली होती. एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना सलील देशमुख यांनी आपण काटोल मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मान्य केले होते. काटोल विधानसभा मतदार संघातील नरखेड येथे एम आय डी सी ची औद्योगिक वसाहत आणण्याविषयी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन अशी बरीच कामे प्रस्तावित असल्याचे सलील यांचे म्हणणे आहे. ही कामे आपण मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिलंय.

Topics mentioned in this article