जाहिरात

Nagpur News : नागपूरकर घराबाहेर पडण्यापूर्वी करतायत 100 वेळा विचार, दबा धरून बसलेल्या 'संकटा'मुळे थरकाप

Nagpur Tiger Terror: नागपूर जिल्ह्यात तकरी, पशुपालक आणि शेतमजूर कमालीचे त्रस्त झाले असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

Nagpur News : नागपूरकर घराबाहेर पडण्यापूर्वी करतायत 100 वेळा विचार, दबा धरून बसलेल्या 'संकटा'मुळे थरकाप
Nagpur News : नागपूरमधील ग्रामीण भागात सध्या भीतीचं वातावरण आहे. (प्रतिकात्मक फोटो)
नागपूर:

Nagpur Tiger Terror:  नागपूर जिल्ह्यात सध्या वाघाच्या दहशतीने ग्रामस्थांची झोप उडवली आहे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील चंन्ना पोहरा परिसरात चक्क वाघाने आपला ठिय्या मांडला असून, गेल्या 4 दिवसांपासून हा वाघ याच भागात फिरत आहे. गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 8 वाजता पुन्हा एकदा वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघाच्या या मुक्त संचारामुळे शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, बळीराजा आता शेतात जायलाही घाबरत आहे.

एकामागून एक हल्ल्यांचे सत्र

पोहरा आणि आसपासच्या परिसरात वाघाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी प्रभू कामडी या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता या वाघाने आसाराम भोतमांगे यांच्या शेळीची शिकार केली, तर कन्हेरी खुर्द शिवारात कारू सीताराम आडे यांच्या बैलाचा फडशा पाडला. 

वेलतूर आणि धानला शिवारातही वाघाने गायी आणि बैलांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शेतकरी, पशुपालक आणि शेतमजूर कमालीचे त्रस्त झाले असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.

( नक्की वाचा : Yavatmal News: माकडाऐवजी माणसालाच टोचलं इंजेक्शन! धक्कादायक घटनेनं वन विभागाची झोप उडाली )

वाघाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

एकीकडे वाघाची दहशत असतानाच, दुसरीकडे त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. वाघ परिसरात असल्याची माहिती मिळताच लोक मोठ्या संख्येने जमा होत आहेत. ही गर्दी धोक्याची ठरू शकते, हे लक्षात घेऊन वनविभागाने पोहरा शिवारात बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे आणि शेतात जाताना समूहाने जावे, असे आवाहन क्षेत्र सहाय्यक आर.डी. सुधेकर यांनी वनविभागाच्या वतीने केले आहे.

अभयारण्य शाप की वरदान?

कऱ्हाडला अभयारण्यातील वाघ आणि इतर हिंस्र प्राणी आता जंगलाबाहेर येऊ लागल्याने शिकारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हे अभयारण्य तालुक्यातील नागरिकांसाठी नक्की शाप आहे की वरदान? अशी चर्चा आता गावागावात सुरू झाली आहे. जंगली जनावरे मानवी वस्तीत किंवा शेतशिवारात येऊ नयेत म्हणून वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना आणि बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून लावून धरली जात आहे.

कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी

वाघाने केलेल्या हल्ल्यात ज्या शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे किंवा जे जखमी झाले आहेत, त्यांना तातडीने आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वनविभागाने केवळ तात्पुरता बंदोबस्त न लावता या वाघाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, जेणेकरून शेतकरी निर्भयपणे आपली शेतीकामे करू शकतील.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com