Nanded News: नांदेड-लातूर महामार्गावरचा पूल भूकंपामुळे पडला? Video Viral होताच धक्कादायक दावा, सत्य काय?

Nanded highway bridge collapse: नांदेड-लातूर महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा ढासळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Nanded News : भूकंपामध्ये एकाही घराचं नुकसान झालं नाही तर पूल कसा पडला?
नांदेड:

योगेश लाटकर, प्रतिनिधी

Nanded highway bridge collapse: नांदेड-लातूर महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा ढासळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विष्णूपुरी भागात घडलेली ही संपूर्ण दुर्घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सुदैवाने या मोठ्या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पूल कोसळल्यानंतर कंत्राटदाराने दिलेले कारण ऐकून सर्वांचेच डोके चक्रावून गेले आहे. रात्री झालेल्या भूकंपामुळे हा पूल पडल्याचा अजब दावा कंत्राटदाराने केला असून, या दाव्यामुळे पुलाच्या निकृष्ट दर्जाबाबत आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement

कंत्राटदाराचा अजब दावा 

नागपूर-तुळजापूर-बोरी या महामार्गावरील विष्णूपुरी जवळ आज (गुरुवार 9 जुलै 2026) हा पूल कोसळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराने पुलाच्या दुर्घटनेचे खापर रात्री झालेल्या भूकंपावर फोडले आहे. रात्री आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पुलाचा भाग ढासळल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. मात्र, नव्याने बांधलेला कोट्यवधी रुपयांचा उड्डाणपूल एका भूकंपाच्या धक्क्याने पडत असेल, तर त्याच्या बांधकामाच्या दर्जावर आणि गुणवत्तेवर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

( नक्की वाचा : Nashik News: नाशिक वाचलं! महाभयंकर ढगफुटीचे संकट घोंघावत असताना 'या' एका स्वदेशी AI नं कसा घडवला चमत्कार? )
 

सर्वसामान्य घरे सुरक्षित मग पूल का पडला?

कंत्राटदाराचा हा दावा खोडून काढत सध्या स्थानिक पातळीवर आणि तांत्रिक वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर अशा प्रकारचा महामार्ग किंवा पूल बांधायचा असेल, तर तो टेक्टॉनिक आणि नॉन टेक्टॉनिक अशा दोन्ही प्रकारच्या भूकंपाचे धक्के सहन करेल इतका मजबूत असणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे असते. त्यातच रात्री आलेला भूकंप हा 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

कंत्राटदाराच्या दाव्यानुसार जर या भूकंपामुळे पूल पडला असेल, तर विष्णूपुरी आणि नांदेड शहरातील इतर जुनी तसेच कच्ची घरे देखील पडायला हवी होती. मात्र, शहरातील एकाही कच्च्या घराला साधा तडाही गेलेला नाही. अशा परिस्थितीत अगदी नवीन असलेल्या या पुलाचा भराव वाहून जाणे आणि पूल कोसळणे ही शुद्ध फसवणूक असल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीत गुंडशाही जिंकली, डॉक्टर हरले! 'त्या' पीडित डॉक्टरचा थेट राजीनामा; शहरही सोडलं )

हा महामार्ग नेहमीच वाहतुकीसाठी अत्यंत व्यस्त असतो. पूल कोसळला त्या वेळी सुदैवाने तिथे वाहनांची किंवा नागरिकांची फारशी वर्दळ नव्हती. जर चालू वाहतुकीत हा पूल ढासळला असता, तर खूप मोठी जीवितहानी झाली असती. या अपघातातून नागरिक थोडक्यात बचावले असले, तरी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

Advertisement

स्ट्रक्चरल ऑडिटची जोरदार मागणी

नवीनच बनवलेला पूल पहिल्याच धक्क्यात भुईसपाट झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप पाहायला मिळत आहे. या संपूर्ण महामार्गाच्या आणि पुलाच्या बांधकामाचे सरकारने तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, अशी जोरदार मागणी आता जनतेमधून होत आहे. या भ्रष्टाचाराला आणि निकृष्ट कामाला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर प्रशासन काय कडक कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

इथे पाहा VIDEO

Advertisement

Topics mentioned in this article