Nanded News : शासकीय नोकरीत तिसऱ्या अपत्याची बाधा नको म्हणून मुलीची विक्री, आठ वर्षानंतर गुन्हा दाखल

Nanded News : एनजीओकडून  आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप त्यांनी केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश लाठकर, नांदेड

शासकीय नोकरी मिळण्यासाठी तिसऱ्या अपत्याची बाधा येऊ नये म्हणून पोटच्या मुलीला विकल्याच्या प्रकार 8 वर्षांनी नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या शासकीय नोकरीसाठी तिसऱ्या अपत्याची बाधा येऊ नये म्हणून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला विकल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. 

सुरेखा या महिलेचा 2009 साली गजानन वांजरखेडे यांच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली झाल्या. दरम्यान वडिलांचे निधन झाल्याने गजानन वांजरखेडे यांना अनुकंपा तत्वावर 2018 मध्ये दुय्यम उनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती. नोकरीसाठी तिसऱ्या अपत्याची अडचण येईल म्हणून एक मुलगी दुसऱ्याला देण्याचा विचार होता. या विषयावरून दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पत्नी सुरेखा हिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. तिन्ही मुले पतीकडेच होते. 

सुरेखा यांनी लोकांची घरकामे करून उदरनिर्वाह केला. आपल्या शुभांगी नावाच्या मुलीला पतीने एका नातेवाईकाला दिल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी सुरेखा यांना समजली. कुठलाही आधार नसणाऱ्या सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना निराधार महिलांना मदत करणाऱ्या एनजीओ बद्दल माहिती मिळाली. एनजीओच्या टीमने ज्यांच्याकडे मुलगी आहे तिथे संपर्क केला. त्या गावातून मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव दुसऱ्या व्यक्तीचे आढळले. मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव वेगळे होते. 

एनजीओकडून  आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पतीविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Advertisement

मुलीच्या जन्मावेळी तिच्या वडिलांचे नाव आणि शाळेत टाकल्यानंतर आताचे नाव या तफावत असल्याने आणि सांभाळ करणाऱ्या जोशी दाम्पत्याकडे मुलगी दत्तक घेतल्याचा कुठलाही पुरावा नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. 

Topics mentioned in this article