योगेश लाटकर
नांदेड यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. हा धबधबा पैनगंगा नदीवर आहे. ह धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे अनेक पर्यटक इथं पर्यटनासाठी येत असतात. तर याच नदीच्या पाण्यातून अनेकदा स्थानिक नागरिक इकडे तिकडे ये जा करत असता. ही बाब त्यांच्यासाठी काही नवीन नाही. पण आज काही भलतचं घडलं. या नदीच्या पाण्यातून मार्ग काढत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढवा. त्यात नदीच्या बरोबर मध्यभागी पाच महिला अडकल्या. त्यानंतर सुरू झाला त्यांच्या बचावाचा थरार.
याच पाण्यातून अनुसया तळंवाड,पूजा तळंवाड, गजरा काठेवाड, कोमल काठेवाड, कामिनी गांजारवाड या महिला पलीकडून अलीकडे नदीच्या पात्रातून येत होत्या. जेव्हा त्या पाण्यात उतरल्या तेव्हा नदीत पाण्याचे प्रमाण कमी होते. पण जेव्हा त्या मध्यभागी पोहोचल्या तेव्हा अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाण्याचा प्रवाह वाढल्याने या महिला मध्यभागीच उभ्या राहील्या. पाणी कमी होईल असं त्यांना वाटत होतं. पण पाणी काही कमी झालं नाही. त्यामुळे नदीच्या मधोमध त्या अडकून पडल्या. आपण आता फसलो आहे. पुढे जावू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर या महिलांनी बचावसाठी धावा केला. त्या ओरडू लागल्या. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा असं त्या जीव मुठीत घेवून ओरडत होत्या. त्याच वेळी सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी काही पर्यटक तिथे आले होते. त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी स्थानिक लोकांना ही माहिती दिली. स्थानिकांनी इस्लापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू झाले.
महिला जीव मुठीत घेवून नदीत उभ्या होत्या. पाणी काही कमी होत नव्हते. महिलांना बाहेर सुखरूप काढण्यासाठी स्थानिक आणि पोलीस प्रयत्न करत होते. जवळपास दोन तास हे बचाव कार्य चालले. शेवटी दोन तासानंतर या महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या महिलांचा जीव भांड्यात पडला. अडकलेल्या महिला या यवतमाळ जिल्ह्यातील एकांबा येथील असून या भागात कापूस वेचणी मजूर म्हणून आल्या होत्या.