ग्रामीण भागात आजही जीवनाचा शेवट झाल्यावर ही यातना सहन कराव्या लागत आहेत. ज्याचा मृत्यू होतो त्याची सुटका होते पण त्याच्यासाठी असणाऱ्या माणसांना मात्र त्रास सहन करावा लागतो. याचा प्रत्यय नुकताच नांदेड जिल्ह्यात तरुण मुलगा गमावलेल्या आईला आला. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. मुलाच्या अंत्यविधाला जाताना आईला जे सहन करावे लागले त्याची कल्पना कुणीच केली नसले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात कुंभारगाव आहे. अंदाजे 200 लोकवस्तीचं हे गाव आहे. या गावात बनलवार कुटुंब राहते. या कुटुंबातील शंकर हा 30 वर्षीय तरुण होता. शंकर अनेक दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण शंकरला जिवदान मिळू शकले नाही. उपचार सुरू असतानाच शंकरची प्राणज्योत मालवली, त्याचा उपचारा दरम्यानच मृत्यू झाला.
शंकरचा मृत्यू झाला त्या दिवशी गावावर आभाळ दाटून आलेले होते. प्रेत घरी नेल्यावर पाऊस आला आणि तो थांबला नाही तर काय कराचे या प्रश्नाने नातेवाईकांना भेडसावले होते. अखेर सल्ला मसलत करण्यात आली. शेवटी ठरलं की शंकरचे पार्थिव थेट गावाजवळील स्मशानात घेवून जावूयात. त्यानुसार निर्णय झाला. पार्थिव स्मशानात पोहोचले. जन्मदात्या आईने मुलगा गेल्यामुळे एकच टाहो फोडला होता. 30 वर्षांचा मुलगा गेल्याचं दुःख या आईला अनावर झालं होतं. यातच तिला बातमी समजली पार्थिव थेट स्मशानात नेण्यात आले आहे.
तिला तिच्या मुलाला एकदा मनभरून पाहण्याची इच्छा होती. तिने यासाठी हट्ट धरला. गावात स्मशानभूमीची जागा आहे. मात्र या स्मशानभूमीला जायला व्यवस्थित रस्ता नाही. गावकऱ्यांची शेत ओलांडून स्मशानभूमीत जावे लागते. वृद्ध आईला पायाने चालता येत नाही. शेतात मोठ्या प्रमाणात दाट पिकं, त्यामुळे आईला शेतात नेणे अत्यंत कठीण काम होतं. आईचा आक्रोश होता. शेवटी उपस्थितांनी आईला चक्क उचलून स्मशानात नेले. आईने शेवटच्या क्षणी मुलाला पाहून घेतलं. पण यासाठी तिचे प्रचंड हाल झाले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजही अशी स्थिती आहे. देश आर्थिक महासत्ता होणार. चंद्रावर वसाहत होणार असे आपण अनेकदा ऐकतो, पण ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तव काय आहे ही बिलोली तालुक्यातील ही घटना पाहिल्यावर लक्षात येते.