
मुंबईत रेल्वे पोलिसांच्या एका मोठ्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. हे नेटवर्क तोडून 5 महिन्यांत 13 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे उकळणाऱ्या रेल्वे पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांत 13 रेल्वे पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ज्यात एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीआरपी (GRP) आयुक्त राकेश कलसागर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही कारवाई अधिक वेगवान झाली. त्यांच्या कार्यकाळातच वरिष्ठ निरीक्षकासह 7 पोलिसांवर कारवाई झाली आहे.
खंडणीचा खेळ कसा चालायचा?
सूत्रांनुसार, हे रॅकेट विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करत होते. मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, बांद्रा टर्मिनस, बोरीवली, ठाणे, कल्याण आणि पनवेल यांसारख्या मोठ्या स्थानकांवर हा प्रकार चालायचा. प्रवाशांना तपासणी नाक्यावर थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम किंवा दागिन्यांवर संशय व्यक्त केला जात असे. त्यानंतर त्यांन प्लॅटफॉर्मवरील जीआरपी रूममध्ये घेवून जाण्यात येत असे. जिथे सीसीटीव्ही कॅमेरे नसत. तिथे प्रवाशांना 'पैसे किंवा दागिनतुमचेच आहेत हे सिद्ध करा' असे सांगितले जात होते.
तुरुंगात पाठवण्याची धमकी
जर प्रवाशांनी हे सिद्ध केले नाही तर त्यांचे सामान जप्त करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जात असे. अनेक प्रकरणांमध्ये प्रवाशांना मारहाणही करण्यात आली. नाइलाजाने प्रवाशांना पैसे देऊन स्वतःची सुटका करून घ्यावी लागत असे. बहुतेक पीडित हे लांब पल्ल्याचे प्रवासी असतात. जे पोलीस स्टेशनच्या कटकटीत पडू इच्छित नाहीत. त्यामुळे ते तक्रार करत नाहीत. संबंधीत रेल्वे पोलीस याचाच गैरफायदा घेऊन खंडणी उकळत असत. या खंडणी रॅकेटच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यासंदर्भात तपास सुरूच आहे. त्यामुळे आणखी काही पोलिसांवर कारवाई होऊ शकते असे मानले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world