योगेश लाटकर, प्रतिनिधी
घरात चोरी झाल्यावर पोलिसांशी संपर्क केला जातो आणि चोरीचा तपास करण्याची विनंती केली जाते पण नांदेड जिल्ह्यात मात्र एक अजबच प्रकार घडला आहे. घरात झालेल्या चोरीचा तपास करण्याची जबाबदारी चक्क एका मांत्रिकावर देण्यात आली आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
हे मंदिर आहे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात असलेल्या केरूर या गावच. या गावातील रामा आरोटे यांच्या घरी जुलै महिन्यात चोरीची घटना घडली. या घटनेनंतर आरोटे यांनी पोलिसांशी संपर्क करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आरोटे यांनी पोलिसांना ऐवजी थेट एका मांत्रिकाशी संपर्क केला. मांत्रिकाला घटनेची माहिती दिली आणि गावातीलच सहा संशयित असल्याचे सांगितलं. मांत्रिक गंगाराम कदरी याने विड्याची पाने तयार करून दिली आणि संशयितांना ही विड्याची पाने खाऊ घालण्यासाठी सांगितले. संशयतांनी हे पान खाल्ले की आपोआप चोर समजेल अशी खात्री या मांत्रिकाने दिली. त्यानुसार राठोड यांनी गावातील सहा संशयितांना मंदिरापुढे बोलवले अन् संशयितांना मांत्रिकाने त्याने सांगितल्यानुसार मंतरलेली अशी विड्याची पाने खायला भाग पाडले. हा सर्व प्रकार चुकीचा वाटल्याने गावातील पोलीस पाटलाने या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.
नक्की वाचा - Pune News : 'काकीला आय लव्ह यू कसा म्हणाला?' 35 वर्षांच्या साईनाथचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून
पोलीस पाटलाने रामतीर्थ पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी राठोड यांना अघोरी प्रकार करू नये याबाबत तंबी ही दिली होती. पण राठोड यांनी पोलिसांना न जुमानता यातील सहा संशयितांना विड्याची पाने खाऊ घातलीच . हे विड्याचे पान खाल्ल्यानंतर परमेश्वर राठोड या तरुणाला थोडा त्रास झाला. त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. परमेश्वर राठोड याने थेट रामतीर्थ पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एकविसाव्या शतक हे विज्ञानाचे शतक म्हणून सांगितलं जातं. आपला देश आर्थिक महासत्ता होणार अशी स्वप्नेही अनेकांना पडत आहेत पण अजूनही ग्रामीण भागात वाईट प्रथा किती खोलवर रुजल्या आहेत हे केरूरच्या घटनेतून दिसून येत. मांत्रिकाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटनांचा जर तपास लागत असेल तर मग पोलिसांची आवश्यकताच काय राहील हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो