आपल्या देशातील अनेक गावं देवी-देवतांना समर्पित आहेत, पण काही दुर्मिळ अपवादही आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिसरख (Bisrakh) हे असं एक गाव आहे, जिथे स्थानिक लोक रावणाला आपला पूर्वज मानतात आणि पारंपरिकपणे दैत्य किंवा पौराणिक राक्षस मानल्या जाणाऱ्या लोकांचा आदर करतात.
असंच एक अनोखं गाव महाराष्ट्रात आहे. हे गाव दैत्यांप्रती असलेल्या श्रद्धेसाठी ओळखलं जातं. या श्रद्धेमुळे गावात एकही हनुमानाचं मंदिर (Hanuman Temple) नाही, कारण हनुमानला दैत्यांचा संहारक मानलं जातं. या मान्यतेमुळे आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे, या गावात 'मारुती' (Maruti) ब्रँडच्या गाड्याही नाहीत. मारुती हे नाव संस्कृत शब्द 'मारुत' (वारा) पासून आलं असून, ते 'पवनपुत्र' हनुमानाचं प्रतीक आहे.
हनुमानाचे एकही मंदिर नाही
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या या गावाचं नाव नंदूर निंबा दैत्य (Nandur Nimba Daitya) आहे. गावातील लोकं मारुतीची पूजा करत नाहीत, गावात त्यांच्यासाठी एकही मंदिर नाही, आणि इतकंच नव्हे तर ते आपल्या मुलांची नावंही हनुमानाच्या नावावर ठेवणं टाळतात.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
या श्रद्धेमागे काय आहे कथा?
या अनोख्या प्रथेमागे एक कथा दडलेली आहे. ही कथा निंब दैत्य आणि भगवान हनुमान यांच्यातील संघर्षाशी संबंधित आहे. कथेनुसार, निंब दैत्य हा राक्षस असूनही तो भगवान रामाचा भक्त होता. त्याने भगवान रामाची प्रार्थना केली, आणि रामाने त्याला गावचा इष्टदेव म्हणून मान्यता दिली, असं मानलं जातं.
मारुती कार का नाही?
'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला गावात डॉ. सुभाष देशमुख हे खूप लोकप्रिय डॉक्टर होते. त्यांच्या दवाखान्याबाहेर रुग्ण आणि आजूबाजूच्या गावातील लोक रांगेत उभे राहायचे. पण अचानक ही गर्दी कमी झाली. डॉ. देशमुख यांना लगेच समजलं की असं का होत आहे.
( नक्की वाचा : Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं )
त्यांनी काही दिवसांपूर्वीच मारुती 800 (Maruti 800) ही गाडी विकत घेतली होती. याच गाडीमुळे लोकांनी त्यांच्यापासून दूर राहणं सुरू केलं होतं. त्यानंतर, त्यांनी आपली मारुती ८०० विकली आणि टाटा सुमो (Tata Sumo) विकत घेतली. आणि मग, चमत्कारिकरित्या पुन्हा त्यांच्या दवाखान्याबाहेर गर्दी होऊ लागली.