प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
राज्यभरात हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागात या हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत. आतापर्यंत अनेक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या हल्ल्यांपासून बचावासाठी वेगवेगळ्या युक्ती लढवल्या जात आहेत. याच अनुषंगाने नंदुरबार येथील आश्रम शाळेत शिकणारा जोसेफ नाईक या ९ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी ‛फार्मर्स सेफ्टी शेड' नावाचे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे काही प्रमाणात नागरिकांचा हिंस्त्र प्राण्यांपासून बचाव होईल, असं म्हटलं जात आहे. चला तर जाणून घेऊया या उपकरणाबद्दल....
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सोनखांब येथील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्याने हे उपकरण शोधलं आहे. येथील जोसेफ फिलिप नाईक या विद्यार्थ्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांवर आणि नागरिकांवरील बिबट्याचे हल्ले जवळून पाहिले आहेत. त्यामुळे या हल्ल्यापासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यासाठी विद्यार्थ्याला काहीतरी उपाययोजना करावयाचा होता. यासाठी विद्यार्थ्याने एक स्मार्ट सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे.
नक्की वाचा - Leopard Viral Video : माथेरानच्या डोंगरातील बिबट्याचा पनवेलच्या 'या' भागात मुक्त संचार, नागरिकांची हवा टाईट
कसा होणार शेतकऱ्यांचा बचाव?
जोसेफ नाईक याने टाकाऊ वस्तूपासून एक उपकरण तयार केलं आहे. या उपकरणामध्ये ब्लूटूथ स्पीकर, व्हायब्रेटर, टॉर्च यांसह गळ्यातील बेल्ट या सुविधांचा समावेश आहे. या उपकरणाद्वारे शेतकऱ्यांच्या गळ्यात एक बेल्ट बसवला जातो. या बेल्टची खांदावरून कमरेपर्यंत बांधलेल्या उपकरणास जोडणी केली जाते. जंगली हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला केल्यास गळ्यात असलेले बेल्टमुळे प्राण्यांना 300 वॅट चा झटका लागेल. त्यामुळे जंगली हिंस्त्र प्राणी त्या शेतकऱ्याला सोडून पळून जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या जीव वाचेल. एकदा चार्ज केल्यानंतर हा डिवाइस 24 तासापर्यंत उपयोगात आणू शकतात. विशेषतः मोबाईल चार्जरने हा डिवाइस चार्ज होईल. लाईट नसलेल्या ठिकाणी चार्ज करण्यासाठी हा डिवाइस डायनामो मोटरच्या साहाय्याने चार्ज केला जाऊ शकतो. उपकरण तयार करण्यासाठी जोसेफला फक्त 140 रुपये लागले असून या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर देखील निवड झाली आहे. याचमुळे येणाऱ्या काळात शेतकरी, शेतमजूर आणि वन विभागाचे कर्मचारी यांच्यासाठी हे उपकरण नक्कीच फायदेशीर ठरणार यात मात्र कुठलीही शंका नाही.