राहुल कांबळे, प्रतिनिधी
Leopard In Panvel Video : पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसरात बिबट्या आणि त्याचा बछडा दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माथेरानच्या डोंगररांगांमध्ये संचार करणारा हा बिबट्या गेल्या काही दिवसांपासून नितळस गाव परिसरात दिसत आहे. गावकऱ्यांनी बिबट्या आणि त्याच्या बछड्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केल्यानंतर वन विभागाने तातडीने गस्त वाढवली आहे.
गेल्या तीन दिवसांत बिबट्याचे दर्शन सलग झाल्याने नितळस गावात वन विभागाची वाहने आणि कर्मचारी सतत गस्त घालत आहेत.गुरुवारी रात्री गावातील तरुण मंडळीही हातात टॉर्च व काठ्या घेऊन वन विभागाच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरली होती. गुरुवारी मात्र बिबट्याचे दर्शन झाले नाही. तरीही बिबट्यामुळे गावातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार मिनल भामरे यांना निवेदन देत गस्त वाढवण्यास आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यास सांगितले. यानंतर वन विभागाने सावधगिरी म्हणून अतिरिक्त पथके तैनात केली आहेत.
नक्की वाचा >> CCTV Video: कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला ठार मारण्याची धमकी, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या मुलासह 7 जणांवर...
खतरनाक बिबट्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
— Naresh Shende (@NareshShen87640) November 14, 2025
नितळस गावातील शेतकरी निलेश म्हात्रे (वय ३५)यांनी बुधवारी रात्री साडेदहा वाजता बिबट्या आणि त्याचा बछडा पाहिला.ते रात्री शेतीचे काम करून इको व्हॅनने घरी जात असताना रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसला.त्यांनी तातडीने त्याचा व्हिडिओ काढला.त्यानंतर बिबट्या आणि बछडा काही क्षणात गवतात अदृश्य झाला. याच दिवशी दुपारी गावातील कुणाल काटे यांनाही बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले जाते.जंगलालगत असलेल्या घरांमध्ये कोंबड्या आणि कुत्र्यांची शिकार झाल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.
नक्की वाचा >> 32 चेंडू..318 चा स्ट्राईक रेट, 10 चौकार अन् 9 षटकार, वैभव सूर्यवंशीने ठोकलं वादळी शतक! गगनचुंबी सिक्सरचा Video
पनवेल तालुक्यातील माथेरान रेंजमधील वांगणी तर्फे तळोजा परिसरात मुंबई–बडोदा मार्गासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात स्फोट करून बोगदे तयार करण्यात आले आहेत.या सततच्या मानवी हस्तक्षेपामुळे या भागातील प्राण्यांच्या नैसर्गिक वावरात अडथळे निर्माण होत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही खारघर टेकडी,मोरबे, वांगणी तर्फे तळोजे,शिरवली,अंबे तर्फे तळोजे,भेकरवाडी या गावांत बिबट्याचा वावर आढळला आहे.मात्र बिबट्याने माणसावर हल्ला केल्याची घटना अद्याप नोंदलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world