प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीनमाळपाडा येथील एका गर्भवती महिलेला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असताना रस्ते आणि वाहन व्यवस्थेअभावी तब्बल ७ किलोमीटरचा प्रवास झोळीतून आणि पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र राणीपूर येथे न्यावे लागले. या हृदयद्रावक घटनेने दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आणली आहे.
Dombivli News: पलावा पुलावरून राजकारण तापले, आजी माजी आमदार आमने- सामने ठाकले
बुरीनमाळपाडा हे गाव भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भागात आहे. पावसाळ्याच्या तोंडावर तर येथील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. कच्चे रस्ते चिखलमय झाल्याने रुग्णवाहिका तर सोडाच साधी दुचाकीचीही ने-आण करणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत आपत्कालीन प्रसंगी गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात नेण्याची वेळ आली.
मात्र वाहन उपलब्ध नसल्याने आणि रस्त्यांमुळे रुग्णवाहिका गावात येऊ शकत नसल्याने गावातील महिला आणि आशा कार्यकर्त्यांनी एकत्र येत महिलेला झोळीत ठेवले. त्यानंतर चिखलमय पायवाटेने सुमारे ७ किलोमीटरचा खडतर प्रवास करत तिला राणीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवले.