वैभव घुगे, प्रतिनिधी:
Nashik Heart Attack Death: सध्या हृदयविकाराचा आजार वाढत चालला आहे. अगदी सहा वर्षांच्या चिमुकल्यांपासून साठ वर्षाच्या वृद्धांनाही हृदयविकाराचा धोका जाणवत आहे. चालता बोलता, जेवणाच्या ताटावर, जीममध्ये अन् शाळेच्या वर्गातही हृदयविकाराने जीव गेल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहावीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. चिमुकलीच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Heart Attack: जीममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
श्रेया किरण कापडी ही या शाळेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. आज श्रेया नेहमीप्रमाणे शाळेत येत होती. शाळेच्या गेटवर प्रवेश करत असतानाच तिला चक्कर आली अन् ती खाली कोसळली. ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी श्रेयाकडे धाव घेतली. त्यांनी तात्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
सहावीत शिकणाऱ्या मुलीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमार्टमधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. या घटनेने शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे.