Nashik News: 'भयावह चित्र, नगरसेविका म्हणून लाज वाटते...' राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा संताप, भाजपवर निशाणा

पुढे या. प्रशासनाला प्रश्न विचारा. नाशिक कोणाच्या बापाचं नाही… ते आपल्या सर्वांचं आहे.चला, या मुर्दाड व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवूया, असं आवाहन हेमलता पाटील यांनी केले आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Nashik Hemalata Patil Viral Post:  नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था, खड्ड्यांचे साम्राज्य अन् रखडलेली विकासकामांवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. नगरसेविका म्हणून मला लाज वाटते अशा शब्दात त्यांनी नाशिकच्या खड्ड्यांवरून संताप व्यक्त केला आहे. त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. 

काय आहे हेमलता पाटील यांची पोस्ट?

जवळपास ३५ वर्षे नगरसेवक म्हणून काम करताना मी नाशिक महानगरपालिकेचा प्रत्येक टप्पा जवळून अनुभवला आहे. अनेक सत्तांतरं पाहिली, अनेक विकासकामं पाहिली, चुका पाहिल्या, सुधारणा पाहिल्या पण आज ज्या पद्धतीने आपल्या नाशिक शहराचं वाटोळं होत आहे, तसं भयावह चित्र मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. आज MNGL आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरभर बेछूट खोदकाम सुरू आहे. जेसीबीवर प्रशिक्षित कर्मचारी नाहीत, तर बिगारी मजूर बसवले जात आहेत. त्यांच्या हातून पाण्याच्या लाईन्स फुटत आहेत, ड्रेनेज उद्ध्वस्त होत आहे, विद्युत वाहिन्या तुटत आहेत आणि त्याची शिक्षा मात्र प्रत्येक नाशिककर भोगतो आहे, अशी खरमरीत टीका हेमलता पाटील यांनी केली आहे.

Advertisement

Maharashtra Rain: सावधान! राज्यभर तुफान पाऊस बरसणार, 'या' तारखा लक्षात ठेवा; प्रशासन अलर्ट

"सिंहस्थाच्या नावाखाली होणारी अनेक मोठी कामे शहराबाहेरील मक्तेदारांना दिली गेली… आणि तीच कामं सबलेट होत होत आज अशा लोकांच्या हातात पोहोचली आहेत, ज्यांना त्या कामाचं ना प्रशिक्षण आहे, ना जबाबदारी. परिणाम काय? एक दिवसाआड फुटणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य लाईन्स घरातून बाहेर पडल्यावर अर्धा-अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अडकलेली माणसं, खड्ड्यांमध्ये घसरून अपघातग्रस्त होणारे नागरिक, निष्पाप जीव गमावणारी कुटुंब, आणि या सगळ्यावर प्रशासनाचं निर्लज्ज मौन, असे म्हणत कुंभमेळ्याच्या कामावरुनही त्यांनी टीका केली. 

तसेच "हा विकास नाही, ही आपल्या शहराची नियोजनबद्ध होणारी हानी आहे. जिथे लाखो भाविक येणार आहेत, त्या रामकुंडाची आजची अवस्था पाहिली की मन सुन्न होतं. कामांच्या गुणवत्तेबद्दल बोलायलाही शब्द उरत नाहीत. आणि ही कामं वेळेत पूर्ण होतील, अशी आशाही आता धूसर वाटते. एक नगरसेवक म्हणून आज मला वेदना होतात लाज वाटते, पण प्रश्न माझ्या भावनांचा नाही, प्रश्न आपल्या नाशिकच्या भविष्याचा आहे," असंही त्या म्हणाल्यात.

शहराची अशी दुर्दशा झाल्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? नाशिककरांनी काही मोजक्या मक्तेदारांच्या मलिद्यासाठी आयुष्यभर त्रास सहन करत राहायचं का? किती दिवस गप्प बसणार आहोत आपण? कारण आज आपण शांत राहिलो तर उद्या आपल्या मुलांनाही याची मोठी किंमत मोजावी लागेल. मी एक नाशिककर म्हणून हे सहन करणार नाही. तुम्हीही करू नका. पुढे या. प्रशासनाला प्रश्न विचारा. नाशिक कोणाच्या बापाचं नाही… ते आपल्या सर्वांचं आहे.चला, या मुर्दाड व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवूया, असं आवाहन हेमलता पाटील यांनी केले आहे. 

Political News: खळबळजनक! भाजप नेत्याचा आमदार निवासात संशयास्पद मृत्यू; 7व्या मजल्यावरुन पडून अंत