प्रांजल कुलकर्णी, नाशिक: नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे गावच्या हद्दीत भुत दिसल्याची अफवा पसरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या भुताने एकाला बेदम मारहाण केल्याचेही सांगण्यात येत असून त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या सगळ्या प्रकाराने नागरिक भयभीत झाले असून घराबाहेर पडणेही मुश्किल झालं आहे.
निफाड तालुक्यातील शिरवाडे ते धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भुत दिसले व भुताने त्या चालकाला मारहाण केली, अशी चर्चा धामोरी परीसरात मोठ्या प्रमाणात चालु झाली आहे. भुत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफित प्रसारित करण्यात येत आहे.चित्रफीतमध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहे.वाहन चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचे फोटोत दिसत आहे. त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना भिती वाटायला लागली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे. जगामध्ये भुत अस्तित्वात नसते. तरीही त्याची भिती दाखवली जाते कारण भुत हे मनात असते. लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये,असे आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.
'सदरच्या फोटोचे निरक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते. सदर चित्रफित व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते. शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावशेच्या रात्री सदर ठिकाणी राहुन दाखविणार आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील भुताची जाण्यास मदत होईल व प्रकरणाचा फोलपणा लक्षात येईल, असंही कृष्णा चांदगडे म्हणालेत.
नक्की वाचा : जीडीपी घसरण्याचा केंद्र सरकारने वर्तवला अंदाज, सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल ?
भिती वाटणार्या लोकांच्या मनातील भुताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलनाचा व प्रबोधनाचा जाहिर कार्यक्रम घेणार आहे. शिवाय शाळेमधुनही विद्यार्थ्यांत वैज्ञानिक जाणिवा निर्माण करणार आहे.त्यामुळे भुत निघाले,ही अफवा असुन रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये ,असे चांदगुडे यांनी शेवटी म्हटले आहे.