Navi Mumbai Airport New Route: राज्यातील विमान वाहतूक क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत हवाई वाहतुकीचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या २९ मार्चपासून 'इंडिगो' या आघाडीच्या विमान कंपनीमार्फत देशातील सहा महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये अहमदाबाद, दीव, गोवा, राजकोट, बेळगाव आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश असून, यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारताशी नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी अधिक भक्कम होणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरुन सहा शहरांसाठी फ्लाईट
नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सेवा वाढवण्याचे नियोजन आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या नवीन फेऱ्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून मुंबई विमानतळावरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. विशेषतः कोल्हापूर आणि बेळगाव या शहरांसाठी थेट सेवा सुरू झाल्याने व्यापारी आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे.
BMC Mayor News: मुंबई महापौरांच्या हातात 1 कोटींचं घड्याळ? माध्यमांवर चर्चा; स्वतः रितू तावडेंनी केला खुलासा
मात्र, एकीकडे देशांतर्गत विस्तार सुरू असतानाच 'इंडिगो'च्या आंतरराष्ट्रीय विमानांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या आकाराच्या विमानांच्या उपलब्धतेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे कंपनीने कोपनहेगनला जाणारी उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. तसेच, दिल्ली ते लंडन आणि मँचेस्टर या महत्त्वाच्या मार्गावरील फेऱ्यांमध्येही कपात करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानांच्या इंजिनमधील बिघाड आणि सुट्या भागांच्या कमतरतेमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे समजते. मात्र, देशांतर्गत उड्डाणांवर याचा कोणताही परिणाम होणार नसून २९ मार्चपासून नियोजित सेवा सुरू राहतील, असे संकेत मिळत आहेत.