- योगेश माने, प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, तो खऱ्या अर्थाने नव्या महाराष्ट्राच्या आर्थिक उदयाचा पुढची अनेक वर्षे लक्षात ठेवावा असा क्षण आहे. NMIA च्या उद्घाटनापूर्वी NDTV मराठीच्या टीमने नवी मुंबईतील स्थानिक मंडळी आणि शहर नियोजन तज्ज्ञांशी बातचीत केली. या सगळ्यांनी एकसुरात या विमानतळामुळे नवी मुंबईचा अथवा मुंबईचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.
(नक्की वाचा: नवी मुंबई विमातळापर्यंत सुरु होणार बससेवा; पालिकेने घेतला मोठा निर्णय)
तज्ज्ञही पडलेत प्रेमात
नगर नियोजन तज्ज्ञ विशाल भार्गव यांनी या प्रकल्पाबद्दल बोलताना म्हटले की, "हा एक आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण आहे, ज्यामुळे व्यवसायाला जबरदस्त चालना मिळेल," 2021 सालापासून अदाणी समूहाने या विमानतळाचे काम हाती घेतली. अनेक आव्हानांचा मुकाबला करत अदाणी समूहाने या विमानतळाचे काम पूर्ण केले. हे विमानतळ पाहिल्यानंतर त्याच्या भव्यतेने थक्क व्हायला होते.
AI आणि स्वच्छ उर्जेच्या वापरावर भर
विमानतळासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात आल्या असून, भविष्याचा वेध घेत AI चाही वापर करण्यात आला आहे. AI-आधारीत रांगेचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आणि डिजी यात्रा सारख्या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना पेपरलेस, कॉन्टॅक्टलेस आणि अत्यंत जलद प्रवासाचा अनुभव मिळेल. शाश्वत उर्जेचा पुरस्कार आणि अंगीकार हे अदाणी समूहाचे धोरण राहिले असून त्याची छाप आपल्याला या विमानतळामध्येही पाहायला मिळते. या विमानतळामध्ये अंतिम टप्प्यात 47 मेगावॉट सौर ऊर्जेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याशिवाय ईव्हीचा वापर ईव्ही चार्जिंग सुविधा, सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल (SAF) स्टोरेज सुविधा याचा अंगीकार हा प्रदूषण करणाऱ्या घटकांचा वापर टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
(नक्की वाचा: नवी मुंबई एअरपोर्टबाबत DGCA चा मोठा निर्णय, 'या' निर्णयाचा काय आहे फायदा?)
3 लाखांहून अधिक नोकरीच्या संधी
NMIA केवळ हवाई वाहतूक क्षेत्रात क्रांती करणार आहे असे नाही, हे विमानतळ नोकरीच्या अनेक संधी निर्माण करणारे ठरणार आहे. नाईटफ्रँक इंडियाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गुलाम झिया यांनी म्हटले की, या विमानतळामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अंदाजे 3 लाखांहून अधिक नोकरी, उद्योगाच्या संधी निर्माण होतील.