Navi Mumbai: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील बदली प्रक्रिया, प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन कार्यकाळ आणि अंतर्गत बदल्यांमधील कथित तफावत यामुळे पोलीस दलात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू आहे. विशेषतः अकार्यकारी शाखांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याने आणि प्रतिनियुक्तीवर गेलेले कर्मचारी मूळ घटकात परत न बोलावल्याने पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नवी मुंबई पोलीस कर्मचारी बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
मिळालेल्या माहितीनुसार, विशेष शाखा, सुरक्षा शाखा, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, वायरलेस विभाग, सीसीटीव्ही कमांड कंट्रोल, वाहतूक शाखा तसेच विविध अकार्यकारी विभागांमध्ये काही कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दुसरीकडे पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्त कर्मचारी मात्र सतत तणावपूर्ण आणि जबाबदारीच्या कामात गुंतलेले असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अनेक कर्मचारी हे प्रतिनियुक्तीवर सीआयडी, एसआयडी, दहशतवाद विरोधी पथक, नागरी हक्क संरक्षण विभाग, अँटी करप्शन ब्युरो तसेच सीबीआय यांसारख्या विभागांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.
नियमांनुसार प्रतिनियुक्तीचा कालावधी मर्यादित असतानाही काही कर्मचाऱ्यांचा कार्यकाळ पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर पात्र आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना त्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. काही कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, प्रतिनियुक्तीसाठी दिलेले अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. वारंवार अर्ज करूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. तसेच प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना मूळ घटकात परत बोलावण्यासाठी कोणतीही प्रभावी प्रक्रिया राबवली जात नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत दर महिन्याला आस्थापना शाखेची बैठक होणे अपेक्षित असतानाही या बैठकीत अशा प्रश्नांवर चर्चा का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी यामागे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली आहे. महिला कर्मचाऱ्यांमध्येही या प्रक्रियेबाबत नाराजी असल्याचे समोर येत आहे. लहान मुलांची जबाबदारी, आरोग्य समस्या किंवा कौटुंबिक कारणे सांगून अनेक महिला कर्मचाऱ्यांनी अकार्यकारी शाखांमध्ये बदलीसाठी अर्ज केले होते. मात्र आवश्यक कागदपत्रे आणि मेडिकल कारणे सादर करूनही त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, काही कर्मचाऱ्यांची संपूर्ण सेवाकाळात पोलीस ठाण्यात नियुक्ती झालेली नाही, तर काहींना वारंवार सोयीस्कर शाखांमध्ये बदली मिळत असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. त्यामुळे बदलीसाठी नेमके कोणते निकष लावले जातात, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना गुन्हे तपास, नाकाबंदी, बंदोबस्त, आरोपींना न्यायालयात हजर करणे, पेट्रोलिंग, ठाणे अंमलदार कर्तव्य अशा जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. तर दुसरीकडे आयुक्त कार्यालयातील काही शाखांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 अशी वेळ असली तरी अनेक कर्मचारी 11 नंतर कार्यालयात येत असल्याची चर्चा आहे.
काही शाखांमध्ये शनिवार अर्धा दिवस, रविवारी साप्ताहिक सुट्टी तसेच गणवेशाची सक्ती नसल्याने त्या शाखांमध्येच राहण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित विभागातून होत असल्याने Navi Mumbai Police Co-operative Credit Society मधून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांमध्ये अनियमितता निर्माण होत असल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यामुळे अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रियेचे स्पष्ट आणि सार्वजनिक निकष जाहीर करावेत, सर्व अर्जांची पारदर्शक पडताळणी व्हावी, प्रतिनियुक्तीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आता पोलीस दलातूनच पुढे येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world