Navi Mumbai News: नवी मुंबई आरपीआयचे जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी नवी मुंबई पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करत उघडपणे रोष व्यक्त केला आहे. कायद्याकडे बोट दाखवत त्यांनी नवी मुंबई पोलीस दलावर गंभीर आरोप केले असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
“अवैध धंद्यांना पाठबळ देण्यासाठीच काही अधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठेवले जात आहे का?” असा थेट आणि संतप्त सवालही महेश खरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत स्पष्ट, लेखी आणि बंधनकारक नियम असताना नवी मुंबई पोलीस दल मात्र गेल्या तीन वर्षांपासून ‘अपवादात्मक बेट' बनल्याचे चित्र समोर आले आहे.
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात? विधान परिषदेवर जाण्यासाठी कसोटी लागणार
नवी मुंबईत वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर!
फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या स्थितीनुसार, नवी मुंबईतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी विहित कार्यकाळ ओलांडूनही एकाच पदावर कायम आहेत. यामुळे प्रशासनाची भूमिका, नियमांची अंमलबजावणी आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 22N नुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा एका पदावरील सामान्य कार्यकाळ दोन वर्षे निश्चित आहे. तसेच, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एखादा अधिकारी एका जिल्ह्यात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असल्यास त्याची बदली बंधनकारक आहे.
नावे, पदे आणि नियम ओलांडलेला कार्यकाळ
मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त)
नियुक्ती : १६ डिसेंबर २०२२
कार्यकाळ : ३ वर्षे १ महिना २० दिवस
संजय येनपुरे (अप्पर पोलीस आयुक्त)
नियुक्ती : २२ फेब्रुवारी २०२३
कार्यकाळ : २ वर्षे ११ महिने १५ दिवस
दीपक साकोरे (अप्पर पोलीस आयुक्त – गुन्हे)
नियुक्ती : १ जून २०२३
कार्यकाळ : २ वर्षे ८ महिने ७ दिवस
अमित काळे, तिरुपती काकडे, संजय पाटील, पंकज डहाणे, (पोलीस उपायुक्त)नियुक्ती : १२ नोव्हेंबर २०२२
कार्यकाळ : ३ वर्षे २ महिने २६ दिवस
हे आकडे केवळ प्रशासकीय माहिती नसून, कायद्याच्या मर्यादांवर थेट बोट ठेवणारे ठोस तथ्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Satara News: सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणखी एक वाघ, ‘हिरकणी'च्या एन्ट्रीचा दमदार Video
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या वेळेवर झाल्या. मात्र नवी मुंबईत मात्र वर्षानुवर्षे तेच अधिकारी त्याच खुर्चीवर कायम राहिल्याने “नवी मुंबई पोलीस दल ‘नो-ट्रान्सफर झोन' बनले आहे का?” असा सवाल उपस्थित होत आहे. बदली, पदोन्नती, अनुभवाची संधी या सगळ्या गोष्टी काही निवडक अधिकाऱ्यांमुळे अडकून पडल्याची भावना बळावत आहे.
प्रशासनशास्त्रानुसार, एखादा अधिकारी जितका जास्त काळ एकाच ठिकाणी राहतो, तितके स्थानिक राजकीय, आर्थिक किंवा अनौपचारिक हितसंबंध निर्माण होण्याचे धोके वाढतात. म्हणूनच बदल्यांचा नियम अस्तित्वात आहे. मात्र तोच नियम नवी मुंबईत निवडक अधिकाऱ्यांसाठी शिथिल झाल्याचा आरोप गंभीर मानला जात आहे.