ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Tulja bhavani Temple News: महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून (२१ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज पहाटेपासून तुळजाभवानी मातेचे मुख्य महाद्वार भक्तांसाठी बंद करण्यात आले आहे आणि दर्शनासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने सुरळीत आणि सुरक्षित दर्शन व्यवस्थेसाठी हे पाऊल उचलले आहे. आज पहाटेपासून भक्तांना आता महाद्वारातून प्रवेश न देता, घाटशीळ पार्किंग येथील दर्शन मंडपातून प्रवेश दिला जात आहे. दर्शन मंडपातून प्रवेश घेतल्यानंतर भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गाने मंदिरात पोहोचता येणार आहे. ही नवीन व्यवस्था आजपासून सुरू झाली असून, ती ८ ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे.
मंदिरातील दर्शनाच्या वेळेतही वाढ करण्यात आली आहे. भाविकांना आता पहाटे १ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत जवळपास २४ तास दर्शन घेता येणार आहे. दर्शनाचा हा वाढीव कालावधी भाविकांना गर्दी टाळून सोयीस्करपणे दर्शन घेण्यास मदत करेल. दरवर्षी नवरात्रीमध्ये तुळजापूर येथे लाखो भाविक येतात, त्यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.
मंदिर प्रशासनाने सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नवीन दर्शन व्यवस्थेनुसार दर्शन रांगेत शिस्त पाळावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.