अविनाश पवार, आंबेगाव: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.विधानसभेचा प्रचार रंगात आला असून अनेक दिग्गज नेते पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघात सभा घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी आयोजित प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी वळसे पाटलांवर जोरदार हल्ला चढवला.
काय म्हणाले शरद पवार?
'आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. दत्तू पाटील यांच्या सांगण्यावरुन महाराष्ट्र विधानसभेत दिलीप वळसे यांची निवड केली. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केले, विविध पदं दिली. विश्वास ठेवला. कधी, विधानसभा, कधी राज्यमंत्रीपदी संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं. आपल्या मित्राचा मुलगा आमदार ,मंत्री झाला याचे समाधान होते, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
वळसे पाटलांवर थेट हल्ला
'ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी आमचा शब्द पाळला नाही, आमची साथ सोडली. मंत्रिमंडळात गेल्याचे जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही. माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आत्ता अलिकडे ही ती भीमाशंकरला आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी जे तुम्हाला सोडून गेले त्या दिलीप वळसेंच्या दारात आम्ही गेलो नाही. थेट भीमाशंकरचे दर्शन घेऊन परतले.आता यांनी बोलायला काही ठेवलं आहे का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
'गद्दारी केली, सुट्टी नाही...'
'ते म्हणतात साहेब येतील पण आमच्यावर बोलणार नाहीत. त्यांच्यावर काय बोलणार? काय ठेवलं आहे बोलायला. त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. महाराजांसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना कधी सोडलं का? त्यामुळं आपल्यासोबत गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा', असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.