"मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे", धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांवर निशाणा

Beed Politics : धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, आम्ही ज्यांचा आजही आदर करतो, त्यांना आदरयुक्त बोलतो. भलेही आम्ही दादांसोबत राहिलो, परंतु कधीही व्यक्तीगत टीका आम्ही त्यांच्यावर केली नाही. मात्र माझे घर, माझी जात यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका करावी लागते.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी शरद पवारांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या नेत्यांना शरद पवार गटाकडून टार्गेट केलं जात आहे. परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी देखील शरद पवार गटाने फिल्डिंग लावली आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 

'मुझे गिराने के लिए कई बडे लोग बार बार गिरे. मगर ये मुमकिन नही है. मला इथेच बांधून ठेवणं, मला टार्गेट करणे हे आजचं नाही. अनेक जणांनी हा प्रयत्न केला आहे. वाईट एका गोष्टीचं वाटतं ज्या नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो. त्या नेत्यांना ही पातळी  गाठली आहे', अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवारांना निशाणा साधला आहे.   

(नक्की वाचा -  शरद पवारांनंतर सर्वोच्च पद जयंत पाटलांकडे? अमोल कोल्हेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा )

आम्ही ज्यांचा आजही आदर करतो, त्यांना आदरयुक्त बोलतो. भलेही आम्ही दादांसोबत राहिलो, परंतु कधीही व्यक्तीगत टीका आम्ही त्यांच्यावर केली नाही. मात्र माझे घर, माझी जात यावर एवढ्या मोठ्या नेत्याला टीका करावी लागते. मात्र परळी वैजनाथ मतदारसंघातील मायबाप जनता अतिशय हुशार आहे, सुज्ञ आहे. त्यांना माहीत असतं की आपल्या माणसाला का टार्गेट केले जात आहे. कुणी टार्गेट करायचा प्रयत्न केला तर त्यांचा टार्गेट कसा हाणून पाडायचं हे सुद्धा परळीकरांना फार चांगलं माहीत आहे, असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवार यांना इशारा दिला आहे. 

(नक्की वाचा - शिवरायांच्या पुतळ्याची उंची सरदार पटेलांच्या पुतळ्यापेक्षा लहान केली : जयंत पाटील)

धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात शरद पवार हे विशेष लक्ष घालत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी हा इशारा दिला आहे.