DCM Ajit Pawar Funeral News: महाराष्ट्राचे लोकनेते, लाडके दादा, लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार पंचतत्त्वात विलीन झाले. अजित पवार यांच्यावर बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इममामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामतीच्या मातीतून तयार झालेलं नेतृत्व, महाराष्ट्राच्या गावखेड्यात पायाला भिंगरी लावून फिरणारे वादळ आज बारामतीच्याच मातीत शांत झाले. पार्थ पवार, जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. लाखोंचा जनसमुदाय,अजित पवार अमर रहेच्या घोषणा अन् कुटुंबीय, नेते, कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश.. अशा भावुक वातावरणात अजित पवार यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
महाराष्ट्राचे लाडके 'अजित दादा' अनंतात विलीन!
बुधवारचा दिवस अख्ख्या महाराष्ट्रासाठी दु:खद बातमी घेऊन उगवला. बारामतीमध्ये प्रचारासाठी येत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवार यांच्या निधनाची बातमी पसरताच बारामतीसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शोककळा पसरली. पुणे, बारामतीसह प्रत्येक जिल्ह्यातील बाजारपेठा बंद झाल्या. त्यांच्या गावात काटेवाडीत चुलही पेटली नाही, प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत जणून घरातीलच व्यक्ती गेल्याची भावना व्यक्त करत होता.
VIDEO: लाडक्या पुतण्याला निरोप, शरद पवार निःशब्द, डोळे मिटले, हात जोडले अन्... मन हेलावणारा क्षण
कार्यकर्त्यांचा आक्रोश, 'अमर रहे'च्या घोषणा.. साश्रु नयनांनी निरोप
आज अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये कालपासूनच कार्यकर्ते, नेत्यांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र भरातून, गावागावातील तरुण, वयोवृद्ध , महिलांनी भरलेल्या गाड्यांचे ताफे बारामतीकडे रवाना झाले. लाडक्या लोकनेत्याला निरोप देण्यासाठी इतकी प्रचंड गर्दी जमली की अवघी बारामती ठप्प झाली. अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या काटेवाडीमधून त्यांची अंत्ययात्रा विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने निघाली.

यावेळी जमलेला लाखोंचा समुदाय, आमचा नेता गेला, लाडका दादा गेला, अजित पवार परत या, अजित पवार अमर रहे, बारामतीचा बाप गेला.. अशा घोषणा देत अश्रु ढाळत होता. अजित दादांना निरोप देण्यासाठी आलेल्या राज्यभरातील लाडक्या बहिणीही आमचा भाऊ गेला, वाली गेला असं म्हणत आक्रोश करत होत्या. यावेळी काही महिलांना भोवळ आल्याचेही पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सलामी देऊन शासकीय मानवंदना देण्यात आली.
दरम्यान, अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दिल्लीसह राज्यभरातील बडे नेते बारामतीमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अभिनेता रितेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज नेते, कलाकार, उद्योजक मंडळी उपस्थित होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world