छगन भुजबळांच्या नावावर ट्रॅक्टर तर बायकोच्या नावावर पिकअप, महागड्या गाड्या कोणाच्या नावावर?

छगन भुजबळ यांची संपत्ती किती आहे?

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधत अनेक उमेदवारांनी 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (NCP senior leader and minister Chhagan Bhujbal) यांनी येवला मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मालमत्तेचे विवरण सादर केले असून त्यानुसार भुजबळ हे 12.50 कोटींचे धनी आहेत.

त्यांची वैयक्तिक जंगम मालमत्ता 1 कोटी 32 लाख 66 हजार 235 रुपये आहे. स्थावर मालमत्तेचे मूल्य 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपये आहे. पत्नी मीना भुजबळ यांच्या नावावर 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रूपये जंगम तसेच 16 कोटी 53 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्वतःकडे 585 ग्रॅम तर पत्नीकडे 455 ग्रॅमचे सोनं आहे.

नक्की वाचा - शरद पवार विरुद्ध अजित पवार, बारामतीच नाही तर 11 ठिकाणी काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला

भुजबळांच्या नावावर ट्रॅक्टर तर मीना यांच्याकडे पिकअप वाहन आहे. विविध ठिकाणी मालमत्ता असून त्यामध्ये रहिवासी आणि शेत जमिनींचा समावेश आहे. भुजबळ दाम्पत्याच्या डोक्यावर 45 लाख 66 हजार 250 रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान भुजबळांच्या नावावर विविध केसेसही दाखल असल्याचं या प्रतिज्ञापत्रात दिसून येते.

छगन भुजबळांची संपत्ती किती?

  • 11 कोटी 20 लाख 88 हजारांची स्थावर मालमत्ता
  • पत्नीच्या नावावर 16 कोटी 53 लाखांची मालमत्ता
  • पाच वर्षांत भुजबळांच्या मालमत्तेत 82 लाखांची वाढ
  • पत्नीच्या मालमत्तेत 8 कोटी 35 लाखांची वाढ 
  • 2019 साली भुजबळांच्या स्थावर मालमत्ता 11 कोटी 38 लाख 14 हजार 
  • पत्नी मीना यांची 16 कोटी 18 लाख रुपयांची मालमत्ता