कोल्हापूर: अलमट्टी धरणाच्या बैठकीत संबंधित बाधित मतदारसंघातील आमदारांना डावलून बैठक घेण्यात येते हे योग्य नाही. दुसरी बाजू जाणून घेण्याचे प्रयत्न सत्तारूढ पक्षाकडून होताना दिसत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची प्रथा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मोडून काढली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज कोल्हापूर येथे पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की "पुराचे पाणी ज्या भागात पोहोचले नाही त्या भागातील आमदारांना बोलून धन्यता मानली गेली. जे सर्व पक्षीय आंदोलन सुरू आहे त्यात सर्वच भाग घेत आहेत. अलमट्टी धरणाचा विषय कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे," असे ते म्हणाले
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, "हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आरोपींना पकडण्यात उशीर झाला यासाठी पॉलिटिकल नेक्सस असण्याची शक्यता आहे. गुन्हेगारांना कुठलीही मदत व्हायला नको, इतकी माफक अपेक्षा आहे. पीडितेच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की खून याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
दरम्यान कामगार महामंडळात भ्रष्टाचाराचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. पैसे वाटपाची नवीन यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे. भ्रष्टाचाराची ही कीड स्थानिक पातळीपासून वरपर्यंत पोहोचली आहे अशी देखील खंत त्यांनी एका विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केली.