NCP National Executive Meet: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकीय हालचालींना आता वेग आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरून या दोन्ही नेत्यांनी विरोधकांना आणि टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आता पक्षाचे नवे पर्व सुरू झाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
विलीनीकरणाच्या भाषेवर छगन भुजबळ यांचा प्रहार
या बैठकीत बोलताना छगन भुजबळ यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांचे पार्थिव समोर असताना काही लोक विलीनीकरणाची भाषा करत होते, हे अत्यंत अयोग्य आणि संतापजनक होते, असे भुजबळ म्हणाले. ज्यांना सुनेत्रा पवार यांची इतक्या लवकर अध्यक्षपदी निवड का झाली असा प्रश्न पडत होता, त्यांनी विलीनीकरणासाठी इतकी घाई का केली होती, असा सवालही त्यांनी विचारला. विलीनीकरणाची चर्चा करणाऱ्यांना भुजबळ यांनी आपल्या भाषणातून थेट आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Sunetra Pawar: राष्ट्रवादीच्या नव्या 'बॉस' समोर 5 मोठी आव्हानं, प्रत्येक पायरीवर असेल कसोटीचा प्रसंग ! )
इंदिरा गांधींचे दिले उदाहरण
सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे समर्थन करताना भुजबळ यांनी इंदिरा गांधींचे उदाहरण दिले. सुरुवातीला इंदिरा गांधी यांनाही अनेकांनी कमी लेखले होते, मात्र पुढे त्यांनी काय करून दाखवले हे संपूर्ण जगाला माहिती आहे, असे ते म्हणाले.
सुनेत्रा पवार यांनी नेहमीच अजित पवार यांच्या सोबत राहून राजकीय आणि सामाजिक कामात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे संपूर्ण पक्ष आणि सर्व ज्येष्ठ नेते सुनेत्रा ताईंच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
तटकरेंचा विरोधकांना इशारा
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आपल्या भाषणात टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. राजधर्म आणि धर्मशास्त्राचे पालन करूनच आम्ही सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते म्हणून निवड केली आहे, असे त्यांनी सांगितले.
काही लोक पैसे देऊन सोशल मीडियावर ट्रोलिंग करत आहेत किंवा टीका करत आहेत, त्यांनी हे लक्षात घ्यावे की आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पर्व सुरू झाले आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी पक्षाची घौडदौड थांबणार नाही, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
सीसीटीव्ही आणि भेटीगाठींच्या चर्चेवर संताप
अजित पवार यांच्या भेटीगाठी आणि सीसीटीव्ही तपासण्याच्या विधानावरूनही सुनील तटकरे यांनी संताप व्यक्त केला. कोणाबद्दल काय बोलतोय याचे भान ठेवा, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यांना राजकारण कळत नाही असे जर कोणाला वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे आहेत, मात्र आज ती वेळ नाही. जर टीका थांबली नाही, तर आम्हालाही अनेक गोष्टी जाहीर कराव्या लागतील, असा सूचक इशाराही तटकरे यांनी यावेळी दिला.