Piyush Goyal EXCLUSIVE: महाराष्टात सध्या २९ महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NDTV नेटवर्कतर्फे आयोजित 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी ठाकरे बंधुंवर निशाणा साधला. मुंबईवर महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले पियुष गोयल?
"विधानसभा निवडणुकीत तुम्ही पाहिले आहे की उद्धव ठाकरेंची अवस्था काय झाली? शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच असते. आम्ही त्यांना उमेदवार उभे करण्यापासून तर अडवले नाही ना? आता माझ्या प्रभारामध्येच अनेक जागा अशा आहेत जिथे भाजप आणि शिवसेनाच निवडून येणार आहे. उभे राहणारे उमेदवारही म्हणतात काय फायदा? म्हणजे जनतेचे प्रेम इतके आहे की विरोधक उभे राहायला घाबरुन जातात, अशी टीका पियुष गोयल यांनी केली.
NDTV BMC Power Play LIVE : "मुंबईचा महापौर शिंदेंचा की भाजपचा हे आधी ठरवा", सुषमा अंधारे
तसेच मुंबईमध्ये "२०० हून अधिक जागा भाजप आणि शिवसेनेच्या येतील. जनतेमध्ये काँग्रेसबाबत, महाविनाश आघाडीबाबत आक्रोश आहे. आता तिन्ही पक्ष वेगळे लढत आहेत. काँग्रेस तर या शर्यतीतही नाही. जनतेमध्ये यांच्याबाबत अविश्वासाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे कधी मतांसाठी मुस्लिमांच्या मांडीवर जाऊन बसतात. राज ठाकरेंचे पुत्र ट्रेन थांबवू असे म्हणतात. असा देश कसा चालेल? हे खूप छोटे विचार आहेत. वादग्रस्त विधाने करुन आपल्या छोट्या विचारांचे दर्शन त्यांनी करुन दिले आहे. ज्याला मतदार उत्तर देतील., असा टोलाही पियुष गोयल यांनी लगावला.
"महायुती जिंकल्यानंतर महापौर कोणाचा हे आम्ही निवडणुका झाल्यानंतर ठरवू. २०१७ खूप लांबची गोष्ट आहे. मुंबईत मेट्रो, अटल सेतूची कामे पूर्ण झाली आहेत. बुलेट ट्रेनचे कामही वेगाने सुरु आहे. मुंबईची वेगाने प्रगती होत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा विश्वास, महाराष्ट्राचा विश्वास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. आमच्यासाठी मुंबईमधील कोणीही परप्रांतीय नाही," असंही पियुष गोयल म्हणाले.