NEET Exam BEST Buses: देशभरात आज नीटची पुर्नपरीक्षा पार पडत आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बेस्ट कडून विविध भागांमध्ये २४ बस मार्गांवर एकूण ६० बसचे नियोजन करण्यात आले. या बसेसद्वारे सुमारे १८० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.कुर्ला, दादर, मलाड, मुलुंड यांसारख्या प्रमुख स्थानकांहून परीक्षा केंद्रांपर्यंत थेट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी या विशेष बस सेवेचा लाभ घेऊन वेळेत व सुरक्षितपणे परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नीट परीक्षेसाठी ज्यादा बसेस, पाहा वेळापत्रक
समोर आलेल्या माहितीनुसार, NEET परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुंबईतील बेस्ट उपक्रमाने पुढाकार घेतला आहे. २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी मुंबईच्या विविध भागांतून ६० बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेसच्या माध्यमातून १८० फेऱ्या पूर्ण केल्या जातील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे शक्य होईल.
परीक्षेच्या केंद्रांची व्याप्ती लक्षात घेता, बेस्टने कुर्ला, सांताक्रूझ, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी, दादर, वांद्रे, मुलुंड आणि घाटकोपर अशा महत्त्वाच्या स्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रत्येक आगाराला त्यांना दिलेल्या परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उदाहरणार्थ, देवनार आगारातून १० परीक्षा केंद्रांसाठी ३ बसेसच्या मदतीने ९ फेऱ्या चालवल्या जातील, तर दिंडोशी आगारातून सर्वाधिक २१ फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

- एकूण बसेस: ६०
- एकूण फेऱ्या: १८०
- सहभागी आगार: १० प्रमुख आगार
- केंद्रे: ४३ परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी सोय
दरम्यान, परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची धावपळ थांबवण्यासाठी हे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बेस्टच्या या विशेष सेवेचा लाभ घ्यावा आणि परीक्षेसाठी घराबाहेर पडताना थोडा वेळ हातात राखून निघावे, असे आवाहन परिवहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world