Mumbai- Pune Bullet Train: मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आता अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते पुणे प्रवास आणखी जलद होणार असून अवघ्या 48 मिनिटांमध्ये मुंबईतून पुण्यात पोहोचता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई-पुणे आणि पुणे हैद्राबादसह 7 बुलेट ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. सध्या मुंबईवरुन पु्ण्याला जायला साडे तीन तासांहून जास्त काळ लागतो. हा प्रवास 48 मिनिटांत पूर्ण होईल. तर पुणे ते हैद्राबाद कॉरिडॉरमुळे 500 किमीचा प्रवास फक्त 2 तास 8 मिनिटांमध्ये शक्य होईल. नवीन कॉरिडॉरची एकूण लांबी 4000 किमी असेल तर यासाठी एकूण 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचा अंदाज आहे.
मुंबई- पुणे अवघ्या ४८ मिनिटात
भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्र सरकारने सात नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉरच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे देशातील प्रमुख शहरे आता काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, या प्रकल्पाचे काम येत्या काळात गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.
या नवीन कॉरिडॉरमुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. विशेषतः मुंबई-पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यान होणारा प्रवास आता केवळ ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या या प्रवासासाठी लागणारा साडेतीन तासांचा वेळ लक्षात घेता, हा बदल दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल. यासोबतच मुंबई-अहमदाबाद (१ तास ५७ मिनिटे), बेंगळुरू-चेन्नई (१ तास १३ मिनिटे), बेंगळुरू-हैदराबाद (२ तास १० मिनिटे) आणि पुणे-हैदराबाद (२ तास ८ मिनिटे) यांसारख्या मार्गांवरही वेळेची मोठी बचत होणार आहे.
रेल्वे मंत्र्यांनी घेतला आढावा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच या प्रकल्पांचा आढावा घेतला असून दिल्ली-वाराणसी आणि दिल्ली-सिलिगुरी या मार्गांवरही काम वेगाने सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. दिल्ली ते सिलिगुरी हा मोठा प्रवास आता केवळ सहा तासांत पूर्ण होऊ शकणार आहे. या प्रकल्पांमुळे केवळ प्रवाशांचा वेळच वाचणार नाही, तर देशाच्या आर्थिक प्रगतीलाही मोठी चालना मिळणार आहे. हाय-स्पीड रेल्वेच्या या जाळ्यामुळे उद्योजकता, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला नवीन बळकटी मिळेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world