Thane News: मुंबई-नाशिक महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आलीय. साकेत पुलाच्या रखडलेल्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. ठाणेकरांच्या आणि मुंबई-नाशिक मार्गे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या साकेत पुलाचे काम अखेर पूर्णत्वास आले आहे. शुक्रवारी (13 फेब्रुवारी) पुलावर 31 डंपर्सच्या सहाय्याने लोड तपासणीचे (Load Testing) काम सुरू होते. लोड तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणि रिपोर्ट आल्यानंतर 16 फेब्रुवारी किंवा 17 फेब्रुवारीपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
वाहतूक कोंडीची समस्या सुटणार?
साकेत पुलाला समृद्धी महामार्ग जोडण्यात आल्याने भविष्यातील ट्रॅफिकची बाब लक्षात घेऊन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे जुना साकेत पुलाच्या शेजारी नवीन पुलाच्या उभारणीचे काम हाती घेण्यात आले. जुन्या पुलाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत असे. अखेर नव्या साकेत पुलाचे काम पूर्ण झालं असून लोड टेस्टिंगचे तपासणीचे काम उर्वरित असल्याचे कळतंय.
(नक्की वाचा: Mumbai Water Metro: मुंबईचं 'स्वप्न' सत्यात! समुद्रातून धावणार मेट्रो;कुणाला होणार फायदा?, वाचा At0 Z माहिती)
नवा साकेत पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार?
यानुसार एमएसआरडीसी विभागाने 13 फेब्रुवारी रोजी 31 डम्परच्या मदतीने तपासणी सुरू केली. प्रत्येक डम्पर 35 टन वजनाचा आहे, 24 तास हे डम्पर या पुलावर वाहतूक करतील. याद्वारे लोडिंग टेस्ट केली जाईल. तपासणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येईल. रिपोर्ट सादर केल्यानंतरच पूल पुढील दोन ते तीन दिवसांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.
नवीन पूल 200 मीटर लांबीचा आहे. याचा वापर ठाणे ते नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडीच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी केला जाईल. तर जुन्या पुलाचा वापर नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडी ते ठाण्याकडे जाण्यासाठी केला जात असे.