गुरुप्रसाद दळवी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निवजे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी काहीस दुर्गम असलेले गाव आहे. मात्र हेच निवजे गाव महाराष्ट्रात कार्बन मुक्त -धुरमुक्त गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. याशिवाय हे गाव आता दुग्ध व्यवसायामुळे आर्थिक संपन्न देखील होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे गाव कार्बनमुक्त-धुरमुक्त म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे. एकेकाळी या गावात सर्रास चुलीवर लाकडे जाळून जेवण केलं जात असे. मात्र या गावात आता कोणीही चुलीसाठी लाकूड जाळत नाही . त्यामुळे गाव धुरमुक्त आणि कार्बनमुक्त झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निवजे गावामध्ये आता चुलींची जागा गोबर गॅस शेगड्यांनी घेतली आहे. अकराशे लोकसंख्या आणि तीनशे कुटुंबे असलेल्या या गावामध्ये 140 पेक्षा जास्त गोबर गॅस प्लांट कार्यरत आहेत. गोबर गॅस प्लांट द्वारा धुरमुक्त गाव करण्याची प्रेरणा या गावाला सिंधुदुर्ग मधील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेने दिली आहे. निसर्ग संपन्नतेतून आर्थिक समृद्धीकडे निवजे गावाला भगीरथने नेले आहे . गोबर गॅस प्लांटसाठी आवश्यक असणारे शेण मिळवण्यासाठी गाव आता दुग्ध व्यवसायाकडे वळले आहे. गोवा किंवा मुंबईकडे नोकरी करणारे या गावातील युवक परत आपल्या गावी येऊन दुग्ध व्यवसाय करू लागले आहेत.
या गावात सध्या दररोज 300 लिटर दूध संकलन होते. वार्षिक एक लाख लिटर पेक्षाही जास्त दूध संकलन होते. गावाचा दुधाचा टर्नओव्हर वार्षिक सुमारे 60,000 ते 1 कोटी एवढा आहे. गावातील युवकांनी हरियाणा येथून मुरा जातीच्या म्हशी आणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. चुलीसाठी लागणारी लाकडे आणण्यासाठी जंगलात आता येथील महिलांना जावे लागत नाही. त्याशिवाय गोबर गॅसवर धूरमुक्त जेवण बनवताना कोणता त्रास होत नाही. जेवण देखील गोबर गॅस वर कमी वेळात बनते. याबद्दल येथील गृहिणी समाधान व्यक्त करत आहेत. निवजे गावातील शेतकरी आता चारा लागवड करून इतर गावातील शेतकऱ्यांना देखील चारा पुरवू लागले आहेत.
दुग्ध व्यवसायासाठी लवकरच मुरा जातीच्या म्हशींची उपलब्धता हरियाणा ऐवजी जिल्ह्यातच करून देण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नातून निवजे गाव आता निसर्ग संपन्नतेतून आर्थिक संपन्नतेकडे जात आहे. आज निवजे येथे वर्षाकाठी सरासरी 70 ते 80 लाखाचे दूध उत्पादित होऊन विक्री केले जाते. सात वर्षांपूर्वी भगीरथ प्रतिष्ठान या ग्राम विकासाचा मंत्र घेऊन काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेने या गावाला वेगळी दिशा दाखवली. या गावाने ही झपाटल्या प्रमाणे काम करत दूध उत्पादन क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवून आणली आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे दुधाचे उत्पन्न दर दिवशी 300 ते 400 लिटर होते. पण चांगल्या सिझनच्या वेळी ते जवळपास 700 ते 800 लिटर प्रतिदिन एवढे होते. निवजे गावात दूध संस्था उभी राहिल्यापासून आतापर्यंत या गावाने एक लाख लिटर दूध उत्पादनाचा टप्पा केव्हाच मागे टाकला आहे. या निवजे गावाला जिल्हा बँकेने आतापर्यंत 50 ते 55 लाखाची कर्ज दिली. यातील एकही कर्ज थकीत राहिलेलं नाही. या गावाने एक तरुणाला प्रशिक्षित करून जनावरांचा डॉक्टर बनवला आहे. हाच डॉक्टर आता निवजे बरोबरच इतर गावातील जनावरांसाठी सेवा देतो. दुग्ध व्यवसायामुळे कोकणातल्या या गावाचा चेहरामोहराच बदलला आहे.