सौरभ वाघमारे, सोलापूर
Solapur News : दक्षिण सोलापूर येथील फताटेवाडी गावात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे मृतदेह सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर ठेवून संतप्त नागरिकांनी आंदोलन देखील केलं. मिथुन राठोड असे आत्महत्या केलेल्या 45 वर्षीय शेतकऱ्याचे नावं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी येथे एनटीपीसी प्रकल्प स्थापित झाल्यानंतर अनेकांच्या जमिनी अधिगृहीत करण्यात आल्या होत्या. या अधिग्रहणचे वाढीव पैसे मिळावेत, तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून एनटीपीसीमध्ये नोकरी मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरु होते.
मात्र त्यात त्यांना यश आले नाही यामुळेही ते त्रस्त होते. त्यातूनच त्यांनी आज आपल्या शेतात आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. मिथुन राठोड याच्या आत्महत्याला एनटीपीसी जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आणि मृताच्या नातेवाईकांनी एनटीपीसी प्रकल्पासमोरचं आंदोलन सुरु केलं. मिथुन राठोड यांचा मृतदेह एटीपीसीच्या प्रवेशाद्वारासमोर ठेवूनं आंदोलनाला करण्यात आलं.