पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नील कुसाळे बाबत राज्य सरकार उदासीन असल्याचे समोर आले आहे. दोन महिने उलटूनही त्याला राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम मिळालेली नाही. याबाबत त्याच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केलीये.कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत असताना, कुसाळे यांनी ही नाराजी व्यक्त केली. सरकारने जाहीर केलेली बक्षीसाची रक्कम तुटपुंजी आहे. नेमबाजांबाबत सरकार इतकं उदासीन आहे असं ही ते म्हणाले. शिवाय असं माहीत असतं तर स्वप्नीलला नेमबाजीत पाठवलंच नसतं, अशा भावनाही स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केल्यात.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिलं. महाराष्ट्रातल्या खेळाडून हे पदक मिळवणं गौरवाचं होतं. त्यामुळे स्वप्नीलच्या पाठीवर कौतूकाची थाप टाकण्यात आली. राज्य सरकारनेही त्याला एक कोटीचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र दोन महिने उलटले तरीही ते बक्षिस अजूनही स्वप्नील कुसाळेला मिळालेले नाही. याबाबत त्याच्या वडीलांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवलेला नेमबाज स्वप्नील कुसाळे याची राज्य सरकारनं चेष्टा केल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली आहे.
खेळातील दर्जा आणि सातत्य कायम ठेवायचं असेल आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवायचं असेल, तर स्वप्नीलला उच्च दर्जाच्या सरावाची गरज आहे असे ही ते म्हणाले. त्यामुळे त्याच्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या बक्षिसाठी रक्कम 5 कोटी करावी, अशी मागणी ही त्यांनी केली. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक मिळवायचं असेल, तर स्वप्निलला चांगल्या दर्जाची बंदूक आणि काडतूस उपलब्ध करून द्यावे लागतील असेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - गरबा खेळत असताना भोवळ आली, खाली कोसळला, पुण्यामध्ये भयंकर घडलं
एका काडतुसाची किंमत 100 रुपये आहे. दिवसाला 300 काडतुसे सरावादरम्यान फायर करावी लागतात. त्यामुळं स्वप्नीलचा दिवसाचा खर्च 30 हजारांच्या घरात आहे. त्यामुळे राज्य सरकारनं केलेली बक्षिसांची तरतूद तुटपुंजी आहे असेही ते म्हणाले. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजला स्वप्नीलचं नाव द्यावं, क्रीडासंकुलाजवळ घर उपलब्ध करून घ्यावं, अशा मागण्या ही त्यांनी या निमित्ताने केल्या आहेत.